गोंगाट

भरतीच्या लाटा जेव्हा
खडकांवर खळाळतात
तेव्हा समुद्र काय म्हणतोय
ते मला समजतं

गगनचुंबी धबधबा जेव्हा
गर्जना करत कोसळतो
तेव्हा नदीला काय म्हणायचंय
ते मला उमजतं

रिमझिम पाऊस जेव्हा
पानाफुलांवर टपटपतो
तेव्हा ढगाच्या मनातलं गुपित
मला लगेच आकळतं

मंद वाऱ्याची झुळूक जेव्हा
खिडकीतून हळूच खुणावते
तेव्हा हवेशी होणारं हितगुज
माझ्या मनाला भावतं

झाडफांद्यांत लपलेला कोकीळ
जेव्हा भैरवी आळवू लागतो
तेव्हा सारा निसर्गच जणू
माझ्याशी संवाद मांडतो

पण हाडामांसाचा माणूस जेव्हा
अनोळख्या भाषेत ओरडतो
तेव्हा मात्र मला केवळ
गोंगाट ऐकू येतो

तिन्हीसांज

आली पाखरं परत । घरट्यांत झोपी गेली
सारं कसं शांत शांत । जशी जगा पेंग आली
ऐकतो मी माझा श्वास । ऊर होई वर खाली
थकले रे माझे डोळे । आता तिन्हीसांज झाली

भगभगीत उजेड । पाडला मी तारुण्यात
म्हणे जग बदलीन । खूप केली यातायात
आता उतारवयात । मला समजूत आली
थकले रे माझे डोळे । आता तिन्हीसांज झाली

फिरलो मी गोल गोल । जसा बैल चऱ्हाटाला
आयुष्याच्या शर्यतीत । नाही विजय मिळाला
आता निर्माल्य निवृत्ती । माझ्या नशिबाला आली
थकले रे माझे डोळे । आता तिन्हीसांज झाली

गेले सोडून मजला । सारे सखे नि सोबती
आता एकलेपणाची । वाटतसे मज भीती
फार उशीराने मला । जीवनाची जाण आली
थकले रे माझे डोळे । आता तिन्हीसांज झाली

कधी वळून पाहतो । कसं आयुष्य घडलं
दुज्यां देऊन टाकलं । जे का पदरी पडलं
होऊ पाहतो सूर्यास्त । उन्हं उतरली खाली
थकले रे माझे डोळे । आता तिन्हीसांज झाली

दूर

माझी व्यथा समजून घे  । हे क्लेश तू साहू नको
पण लक्ष दे माझ्याकडे । दूर तू पाहू  नको 

जाहल्या जखमा जरी । मलमपट्टी मज नको
फक्त निजण्या बाज दे । दूर तू पाहू  नको 

होउनी भयभीतशी । पाहशी का मजकडे
अस्वस्थ आणिक भ्रांत मी । दूर तू पाहू  नको 

केलि मी पापे जरी । तव क्षमा मजला नको
एक पांथिक श्रांत मी । दूर तू पाहू  नको 

मीच केवळ ना बळी । दिसती मला तव यातना
चल मिळुन भोगू तयां। दूर तू पाहू  नको 

जिंकीन मी हा सामना । जर खेळशिल माझ्यासवे
ये हात हाती घे जरा । दूर तू पाहू  नको 

दिवस येतिल चांगले । हे तू मला सांगू नको
घे मला जवळी तुझ्या ।  दूर तू पाहू नको