कसे राहाल?*

सांगा, कसे राहाल?

आदर्शवादी राहाल
तर कोठे जायचे आहे ते तुम्हाला समजेल

व्यवहारी राहाल
तर तेथे का जायचे आहे ते तुम्हाला उमजेल

दूरदृष्टीने राहाल
तर तुमचे गंतव्य स्थान कायम तुमच्या नजरेत राहील

युक्तिबाज राहाल
तर तुम्हाला तेथे पोहोचण्याचे नवे मार्ग मिळतील

शिस्तबद्ध राहाल
तर तुम्ही मार्गावर अविरत प्रगती करीत राहाल

संतुलित राहाल
तर निसरड्या वाटेवर तुमचं पाऊल घसरणार नाही

सहनशील राहाल
तर वाटेतले अडथळे तुम्हाला निराश करणार नाहीत

कनवाळू राहाल
तर तुमचे सहयात्री तुमच्या मदतीला येतील

सहानुभूतिशील राहाल
तर तुमचे साथी तुमच्या संगतीने चालतील

प्रामाणिक राहाल
तर तुमची यशे आणि अपयशे तुम्हाला स्पष्ट दिसतील

सत्यवचनी राहाल
तर लोक तुमच्या शब्दांचा आदर राखतील

काटकसरी राहाल
तर तुम्ही आपल्या पृथ्वीकडून आवश्यक तेवढेच घ्याल

कृतज्ञ राहाल
तर तुमची सारी सत्कृत्ये सेवाभावाने होतील

एकाग्र राहाल
तर तुमचे ध्यान पुढच्या मार्गावर केंद्रित राहील

प्रबुद्ध राहाल
तर तुमचा मार्ग घन्या अंधारातही ज्ञानदीपांनी उजळता राहील

आता सांगा, कसे राहाल?

गर्ता*

माझ्या ह्या वेडामुळे
मला सत्य दिसतंय
की सत्याकडे पाहून
मला वेड लागलंय?

माझ्या ह्या विषण्णतेमुळे
मला जगाच्या यातना कळल्यायत
की जगाच्या यातना साहून
मी विषण्ण झालोय?

माझा हा एकाकीपणा
गर्दीतही मला अनोळखी करतोय
की अनोळखी लोकांची ही गर्दी
मला एकाकी करून टाकतेय?

माझा हा स्वार्थीपणा
तुला निर्दय व्हायला भाग पाडतोय
की तुझ्या निर्दय वागण्याने
मी आणखी स्वार्थी झालोय?

माझी कल्पनाशक्ती लोपल्याने
मला हा थकवा आलाय
की माझ्या थकव्यामुळे
माझी कल्पनाशक्ती शमलीय?

इतकी दमलीयत माझी पाउलं
ती अंतहीन चालण्यामुळे
की एका ठिकाणी इतका वेळ थांबल्याने
पाउलं चालणं विसरलीयत?

हे अथांग अवकाश
माझे रिक्त कोरडे डोळे निरखतंय
की माझे डोळे निरखतायत
त्या अथांग रिक्त अवकाशाची
गर्ता?

उमाळा*

इच्छांची इच्छाच संपून गेलीय
हव्यासांचा हव्यासही निवळलाय
गरजांची गरजही राहिली नाहीये
आता मला बोचतंय हे निष्फळ औदासीन्य

कामनांची कामनाच होत नाहीये
भूक तहानही पार पळालीय
कल्पनांची कल्पनाही उरली नाहीये
आता फक्त उरलंय हे शापित औदासीन्य

आकांक्षांची आकांक्षा अदृश्य झालीय
विरहाचा विरहही विरून गेलाय
झुरण्यासाठीचं झुरणंही झरलंय
आता मला जाळतंय हे जळतं औदासीन्य

तल्लफेची तल्लफ तडीपार झालीय
वासनांच्या वासनेची वासलात लागलीय
हुरहुरींची हुरहूरही हरवून गेलीय
राहता राहिलंय हे अमर्याद औदासीन्य

ओढींची ओढही ओसरून गेलीय
खाजेची खाजही खूप कमी झालीय
कंटाळ्याचाही कंटाळा आलाय
आता मला पिडतंय हे असह्य औदासीन्य

आता मी शोधतो आहे
एक लालसा, एक उद्युक्ती, एक चेतना
एक क्षुधा, एक उत्सुकता, एक प्रेरणा

माझ्या उदास मनाला
आता हवा आहे एक नवा ध्यास
एक नवा उमाळा

चालत रहा*

चालत रहा
किर्र अंधाऱ्या रात्रीतून
कारण तिच्या पलिकडे
उद्याची सकाळ आहे

पोहत रहा
प्रक्षुब्ध सागराच्या लाटांवरून
कारण त्यांच्या पलिकडे
वास्तवतेचा किनारा आहे

पाऊल ओढत रहा
निर्दय शिशिराच्या बर्फातून
कारण त्याच्या पलिकडे
वसंताचा पहिला बहर आहे

वाट काढत रहा
दाट काटेरी जंगलातून
कारण त्याच्या पलिकडे
झुळझुळ वाहणारा झरा आहे

आरोहत रहा
उत्तुंग पर्वतांच्या शिखरांवरून
कारण त्यांच्या पलिकडे
एकांताचं अथांग सरोवर आहे

भटकत रहा
या निनावी शहराच्या रस्त्यांवरून
कारण त्यांच्या पलिकडे
घरातल्या चुलीची ऊब आहे

कष्ट करत रहा
आला दिवस जाईपर्यंत
कारण त्याच्या पलिकडे
समाधानाची संध्याकाळ आहे

चालत रहा
साऱ्या संकटांतून, विपत्त्यांतून, आपत्त्यांतून
चालणं हेच आपलं आयुष्य
थांबणं म्हणजे संपणं

कधीतरी*

एक कविता… जी लिहायची राहून गेलीय
एक कविता… जी लिहिण्याचं धारिष्ट्य होत नाहीय
एक कविता… जी माझ्या आत्म्याला झोंबतेय
एक कविता… जी मला रात्रभर जागं ठेवतेय

अशी कविता… जिच्यात माझी माणुसकी भरलीय
अशी कविता… जिच्यात माझी विचारसरणी भिनलीय
अशी कविता… जिच्यात माझी अरक्षितता दिसतेय
अशी कविता… जिच्यात माझी प्रत्येक जखम धसतेय

ती कविता… जिने माझ्या मनाचा अंतराय शोधला
ती कविता… जिने माझ्या मनाचा गाभारा उजळला
ती कविता… जिने माझ्या मनातल्या ज्वाळा विझवल्या
ती कविता… जिने माझ्या मनातल्या वेदना शमवल्या

ज्या कवितेत… मी शून्यात डोकावून पाहिलं
ज्या कवितेत… मी दृष्टिहीनतेचं दुःख साहिलं
ज्या कवितेत… मी माझाच मला न्याहाळत राहिलो
ज्या कवितेत… मी आरशातल्या स्वतःला कुरवाळत राहिलो

त्या कवितेत… मी तुला बहाल केलेल्या यातना हव्या
त्या कवितेत… मी तुझ्यावर लादलेले अन्याय हवे
त्या कवितेत… माझा अप्पलपोटेपणा आणि ध्यास हवा
त्या कवितेत… माझ्या अहंकारितेचा उपहास हवा

कधीतरी… मी स्वतःला निरखण्याचं धैर्य गोळा करणार
कधीतरी… मी उजळ माथ्याने या जगात फिरणार
कधीतरी… मी माझ्या स्वत्वाला उघडं आभाळ दाखवणार
कधीतरी… मला आतून पोखरणारी ती कविता मी लिहिणार

समाधी*

हे कसलं वेड लागलंय मला?
का बेबंद झालंय माझं मन?
सहजपणे मी भटकतो आहे
वास्तवामधून कल्पनेकडे

हे कसलं वेड लागलंय मला?
गरगर फिरतंय माझ्या मनातलं होकायंत्र
अथांग अंतरिक्षात हिंडतोय मी माझं गीत गात
नक्षत्रांचा वद्यवृंद साथीला घेऊन

हे कसलं वेड लागलंय मला?
माझं स्वत्व झालंय समुद्रतळासारखं शांत
त्याच्या पृष्ठभागावर असोत कितीही लाटा
खोलवर मी झुलतोय समुद्रफुलांसमवेत

हे कसलं वेड लागलंय मला?
शोधतोय मी माझ्याच मनाची अपार  क्षितिजं
अबाधित, निश्चिंत, निरामय होऊन
विहरतोय मी स्वतःच्या अंतरावकाशात

हे कसलं वेड लागलंय मला?
पार निवळून गेल्या आहेत साऱ्या भावना
विरल्यात साऱ्या वेदना, सुखदुःखांनीही काढलाय पळ
नको आता काही उपाय, नको दिलासा,नको सांत्वन

हे कसलं वेड लागलंय मला?
तू आणि मी यांतला फरकही मला कळेना
कसलीच तमा राहिली नाही मला आता
सत्य काय अन् मिथ्य काय हेही आकळेना 

हे कसलं वेड लागलंय मला?
कशाने झालोय मी असा... अनुभवातीत, अतींद्रिय, अमर्याद?
हीच का ती ध्यानस्थ, चिंतनशील अवस्था... ती समाधी
बुद्धाला सुद्धा जिची वर्षोनवर्षं वाट पहावी लागली?

आता*

आता… कुठल्याही क्षणी…
एका बीजाला भंगून दोन पानांची नवी पालवी बाहेर पडेल
आता… कुठल्याही क्षणी…
एक पक्षीण आपल्या पिल्लांच्या चोचीत त्यांचा पहिला घास भरवेल

आता… कुठल्याही क्षणी…
अंडं फुटून एक लहानगं कासव रांगत अफाट अपरिचित सागरात शिरेल
आता… कुठल्याही क्षणी…
फाटत्या कोशातून एक फुलपाखरू सौंदर्यसम्राज्ञीच्या थाटात उगवेल

आता… कुठल्याही क्षणी…
एक नवजात अर्भक टाहो फोडून आपलं आगमन जाहीर करेल
आता… कुठल्याही क्षणी…
एक खट्याळ बालक आरशातल्या स्वत:ला वाकुल्या दाखवेल

आता… कुठल्याही क्षणी…
एक युवक डोळ्यांत लाखो तारे नाचवीत प्रेयसीला प्रेमाचं गाऱ्हाणं घालेल
आता… कुठल्याही क्षणी…
एक जोडपं एकमेकांना घट्ट मिठी मारून भरल्या डोळ्यांनी निरोप घेईल

आता… कुठल्याही क्षणी…
एक वाटसरू नव्या मार्गावर आपली वाटचाल सुरू करेल
आता… कुठल्याही क्षणी…
कोण्या एकाचं जग कायमचं बदलून जाईल

आता… कुठल्याही क्षणी…
विश्वाच्या अपार चित्रपटावरचे हे अगणित चमत्कार तुला दिसतील
आता… कुठल्याही क्षणी…
तुझ्या डोळ्यांतली सगळी स्वप्नं साकार होऊन खुदकन हसतील

मैया*

वितळणाऱ्या हिमनदीतून
पारदर्शक पाण्याच्या थेंबांचा
टिपटिप पडणारा मोतीसर

खडककड्यांच्या विशाल वक्षावर
रुळणारे, वळणारे, खेळणारे
तिच्या प्रवाहाचे चकाकते चंद्रहार

शाळा सुटल्याच्या आनंदाने
खळखळून हसणाऱ्या, नाचणाऱ्या
बालिकांसारखे ते अवखळ ओढेनाले

असहाय्य भक्ष्याच्या शोधात 
सरपटणाऱ्या अजगरासारखा
तिचा बलदंड, गतिमान, भयानक ओघ

एकमेकांना पाहताच धावून
गळामिठीत आपलं स्वत्व अर्पण करणाऱ्या
प्रेमिकांसारखे तिचे संगम

शांत, प्रसन्न, विपुल, विचारशील
गावांतून, शहरांतून वळणे घेत
गावकऱ्यांच्या उपेक्षेचे असंख्य कलंक भाळी घेऊन

दैनंदिन आरत्यांचा कर्कश जल्लोष
सहिष्णुतेने सहन करीत
संथ वाहणारं तिचं विशाल पात्र

वळणावळणावर नाव बदलणाऱ्या
हिमालयातल्या त्या नदीची
ही अनेक रूपं मी पाहिली आहेत

पण तिच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या तिच्या लेकरांना 
एकाच नावाने तिची ओळख आहे…
मैया

संदूक*

लहानपणी लपंडाव खेळतांना
आता आपण कुणाला सापडणारच नाही
ह्या भीतीने पोटात पडलेला खड्डा

विहिरीत सूर मारतांना
कोंडलेल्या श्वासातून झालेला
स्वत:च्या मर्त्यतेचा पहिला साक्षात्कार

तिनं नजरेनेच हो म्हटल्यावर
अनावर आनंदित होऊन हृदयाने
मारलेल्या कोलांट्याउड्या

हिमालयाच्या पायथ्याशी झालेली
आपण अणुरेणूहून सूक्ष्म आहोत
ही अहंभाव हरवणारी जाणीव

पौर्णिमेच्या चांदण्यात फिरतांना
ओठांतून शब्द निघण्याआधीच
हाताने हाताशी केलेलं अजब हितगूज

त्यांनी शेवटचा श्वास घेतला
आणि उच्छ्वास सोडलाच नाही
त्या क्षणी शोकाने गदगद हललेलं अंग

अधूनमधून माझ्या आठवणींची 
संदूक उघडून मी बसतो
आणि आतली अमोल रत्नं 
परत निरखून पाहत असतो

विराणी*

जर आपल्या नजरा कधी भिडल्याच नसत्या 
तर माझ्या आयुष्यात एकच खंत राहिली असती 
की आपल्या प्रेमाची ही कहाणी
न सांगताच संपली असती 

जर मी तुला केवळ दुरूनच पूजलं असतं
जर आभाळातल्या ताऱ्यासारखं तुला निरखलं असतं
तर माझ्या ह्या भावनांची पणती
न तेवताच विझली असती 

जर आपली गळाभेट कधी झालीच नसती
जर आपल्या प्रेमाच्या पूर्तीची वेळ आलीच नसती 
तर माझ्या आत्म्याची आसक्ती 
न प्राशताच शमली असती 

जर तू माझ्याकडे व्याकुळ होऊन पाहिलं नसतंस
जर तुझ्या डोळ्यांतले अश्रू मला दिसले नसते 
तर माझ्या मनातली वादळं
न वाहताच ओझरली असती 

जर तुझ्या आसवांतून तू मला सांगितलं नसतंस
की जे शक्य नाही त्याची स्वप्न पाहूं नकोस 
तर माझ्या हृदयाची शकलं
न भंगताच एकवटली असती 

जर आज एकटाच मी माझ्या मृत्यूला तोंड देत नसतो 
जर आज एकटाच मी शेवटचा श्वास घेत नसतो 
तर माझी ही अखेरची विराणी 
न आळवताच ओघळली असती