काव्य*

काव्य म्हणजे कागदावर उमटलेल्या भावना
काव्य म्हणजे बोचणाऱ्या झोंबणाऱ्या यातना
काव्य म्हणजे प्रेरणेची आर्त आतुर प्रार्थना
काव्य म्हणजे कल्पनेला आर्जवाची चेतना

काव्य म्हणजे मानवाच्या अस्मितेची स्पंदने
काव्य म्हणजे मानवाच्या वेदनेची वाहने
काव्य ही कातावलेल्या कामनांची कीर्तने
काव्य ही तर नादध्वनिची आगळी आवर्तने

काव्य म्हणजे भावपंकी कमळ उमले कोवळे
काव्य म्हणजे कविमनाचे मर्म झाले मोकळे
लोक बघती दगडधोंडे; शिल्प कविला आकळे
शक्त कविच्या कुंचल्यातुन चित्र बनते वेगळे

काव्य म्हणजे आळवोनी शब्दभिक्षा मागणे
काव्य म्हणजे तळमळोनी मध्यरात्री जागणे
काव्य म्हणजे लख्ख पडले शारदेचे चांदणे
काव्य म्हणजे जे कवीला स्वप्न पडले देखणे

भूत*

खरं सांगू का?
ह्या कविता मी लिहीत नाही
त्या स्वतःला लिहवून घेतात माझ्याकडून
उभ्या राहतात माझ्या डोळ्यांत
अश्रूंसारख्या
आणि मग माझं कलम मारतं सूर
माझ्या मनातल्या शाईच्या दौतीत

खरं सांगू का?
हे शब्द मी निवडत नाही
ते स्वतःहून माझ्या समोर येतात
पाखरांच्या सुंदर ओळींसारखे
त्यांचा हा आकृतिबंध 
मी नाही घडवत - तो आपोआपच घडतो

खरं सांगू का?
एखाद्या कवितेत किती कडवी असतील
हेही मला ठाऊक नसतं
आता हीच कविता पाहा नं
आणखी एक कडवं उरलंय
असं माझी प्रेरणा मला खुणावून सांगतेय

खरं सांगू का?
कधीकधी असं वाटतं 
की आपणां सर्वांत सामावलेल्या
वैश्विक धुळीचं असेल का हे एक रूप?
नाहीतर मग मला झपाटून राहिलंय 
कधीकाळी काळात विलीन झालेल्या
एखाद्या अनामिक कवीचं भूत?