आव्हान

ही माझी कविता
इथे अन् आता जन्म घेतेय
कोण जाणे कुठल्या विश्वात ही संपेल?

ही माझी कविता
आहे अपार अथांग
आहे अमर्याद अनादि अनंत

ही माझी कविता
नाही सुखदायक दुःखहारक
नाही क्लेशशामक शोकविदारक

ही माझी कविता
नाही कोमट उदासीन शिळी वरणवाटी
ही आहे उसळत्या उकळत्या लाव्हाची रसरसती मूस

ही माझी कविता
आहे लखलखत्या सत्याची प्रदीप्त उल्का
ही कोरडे करून टाकील सारे मिथ्याचे सागर

ही माझी कविता
नाही एखाद्या विझत्या ताऱ्याचा अशक्त उजेड
ही आहे शंभर सूर्यांच्या भडकत्या विस्फोटाची अग्निशिखा

ही माझी कविता
नाही कोणा एकट्या शोषिताची असहाय आरोळी
हे आहे आम्हां सर्वांनी मिळून तुम्हांला दिलेलं आव्हान…

गरिबाचं गाऱ्हानं

(अनुवादित कविता: कवयित्री नाझिश शाह यांच्या "गरीब की गुहार" या अतिशय सुंदर हिंदी कवितेचे मी केलेले मराठी रूपांतर)  
आठ वाजता फर्मान निघालं
बारा वाजता कुलपं लागनार
जमीन हलली पावलाखाली
आता नाही आपन घरी परतनार

लाइनीला लागन्याची सवय तर व्हती
पन बंद खोलीत किती येळ बसनार
गल्लीतल्या कुत्र्यांस्नी जसं भेटतं तसं
म्हनत्यात, तुमालाबी जेवन भेटनार

आमची राहती जागा हिरावली
भूक मिटवन्याची साधनं गमावली
पोलीस पाडत्यात लाठ्यांचा पाऊस
“बसा गपचूप, कशाला मस्ती गावाची
गाव हाय पाचशे मैलांवर, नाही ट्रेन ना बस
आन् बाॅर्डर हाय बंद, पकडा वाट परतीची”

मुसमुसून आसवं सुकून गेली
आरोळी कोरड्या जिभेला अडली
आम्हाला घरी पाठवायची सोय का नाही केली?
परदेशी राहनाऱ्यांना आनायला विमानं पाठवली

जवा कोर्टानंबी आमची सुनावनी नाकारली
तवा आम्ही पायीच गावाची वाट पकडली
चपला जुती सारी पार घासून गेली

चला सामान मुलंबाळं पाठुंगळीला घेऊ
भूक लागली की कोरडी बिस्किटं खाऊ
आलं मरन तर रस्त्यातच मरून जाऊ

घरच्या आठवनीनं फार सतावलं
कश्या ऱ्हात असत्याल माय अन् बाईल
इथं ऱ्हायलो तर भुकेनंच मरनार
न्हाई तर आम्हाला हा करोना घेऊन जाईल

ट्रेन तर तुम्ही चालवनार न्हाई
चालल्या तरी तिकिटाचे पैशे न्हाईत
चला कसं तरी करून तिकीटही काढू
पन तुम्ही कवा पाठवाल कोनाला म्हाईत

चांगली थट्टा करताय राव आमची
ट्रेनचे पैशे घेऊन वर कॅन्सल करताय
आम्हाला बांधिलकीचे मजूर ठरवताय
आन् वर परत मजुरी कायदा बदलताय

तुम्हास्नी काय फरक, आम्ही जगलो किंवा मेलो
रोगराई तुमची आन् जुलूम आमच्यावर
म्हनं आम्ही खेडूत, गुन्हेगार, देशद्रोही
गप ऱ्हात न्हाई आम्ही बंद खोलीत डांबल्यावर

तुम्हीच आनली ही परदेशी रोगराई
आम्ही टीबी, काॅलऱ्यानं मरतच हाओत
रोगराईनं मेलो नाही तर भुकेनं
आम्ही कुठल्याबी हालातीत मरतच हाओत

आता कृपा करून आम्हाला मोकळं सोडून द्या
तुम्ही बसा बंद खोलीत, आम्हाला जाऊन द्या
ही रोगराई तर बाबा हाये सबब पुरानी
गरिबी आन् श्रीमंतीची हाये ही कहानी

मार्बल

आम्ही पुण्यात जिथे राहतो
तिथे पूर्वी शेतं होती
ऊसांचे दाट फड होते
रात्री भुतंखेतं होती

शेती जाऊन वर्षे झाली
आता आले हाय राईझ
मजल्यांवरती चढले मजले
हरेक फ्लॅट किंग साईझ

शेतकऱ्यांनी पैसे केले
इथून आले तिथून गेले
छोटे शून्य मोठे शून्य
एक फेके दुसरा झेले

झोपडीत म्हातारा निजतो
तेल संपतं, पणती विझते
माॅल मध्ये धाकटी नात
मार्बलच्या फरश्या पुसते
 

काठी

तामीळ भाषेत हिपहॉप आणि पंजाबीत रॅप
पाश्चात्यांच्या संस्कृतीची फिट्ट बसली कॅप
मराठीला विसरा आता, इमोजीत बोला
ओतून टाका सरबतं, उघडा कोका कोला

फेकून द्या ते लेंगे-सदरे, चढवा टाईट जीन्स
उसळ मिसळ काय खाताय, या घ्या मेक्सिकन बीन्स
चिवडा लाडू बेचव खाणे, हवा चाॅकलेट केक
मटण, वडे... ई! जुनाट डिशेस्, हवे रिबआय स्टेक

नव्या जमान्याचे रसिक, नवी सेन्सिबिलिटी
संवेदनक्षमता केव्हाच मेली, आली व्हल्नरेबिलिटी
फाडफाड इंग्लिश बोलून मारा इंप्रेशन
आपल्या भाषेत र्हिदम नाही, नाही एक्स्प्रेशन

फ्रोझन पीज, फ्रोझन चिकन, थिजलं सर्व काही
पश्चिमेच्या पावसामध्ये भिजलं सर्व काही
भ्रष्ट नक्कल करता करता बुद्धी झाली नाठी
आंधळ्याच्या हाती आली लाल पांढरी काठी

पोतराज

फिरवा चाबूक हाणा रट्टे
आपल्याच पाठीवर पाडा घट्टे

नखांनी काढा बाहेर आतडी
आपल्याच हातांनी लोंबवा कातडी

आपणच लांडोर आणि आपणच मोर
आपणच साव आणि आपणच चोर

आपल्याच पराक्रमांची आपणच गा गाथा
आपल्याच ढुंगणावर आपल्याच खा लाथा

तुमच्यावरील अन्यायाला देताय तुम्हीच पुष्टी
आपलीच बुबुळे उचकटण्याची कुठली ही दूरदृष्टी?

सर्वव्यापी परिवर्तनाची टळते आहे वेळ
आणि तुम्ही चालवलाय डोंबार्याचा खेळ

खणखण खणखण थाळी वाजवून
तुमची मुलं न्याय मागतायत

वरती आलिशान ग्यालरीत बसून
शेठजी तुमची गंमत बघतायत!