मार्बल

आम्ही पुण्यात जिथे राहतो
तिथे पूर्वी शेतं होती
ऊसांचे दाट फड होते
रात्री भुतंखेतं होती

शेती जाऊन वर्षे झाली
आता आले हाय राईझ
मजल्यांवरती चढले मजले
हरेक फ्लॅट किंग साईझ

शेतकऱ्यांनी पैसे केले
इथून आले तिथून गेले
छोटे शून्य मोठे शून्य
एक फेके दुसरा झेले

झोपडीत म्हातारा निजतो
तेल संपतं, पणती विझते
माॅल मध्ये धाकटी नात
मार्बलच्या फरश्या पुसते
 

कविराजा

शब्द आणिले तुला मी
कविराजा लडिवाळा
बाळमुठीत धरून
वाजवी रे खुळखुळा

आल्या उपमा उत्प्रेक्षा
बघ तुझ्या बारशाला
त्यांचे पदर फाडून
लावू तुझ्या दुपट्याला

आले नाही जरी दात
तरी सर्वांना चावतो
नाही येत रांगताही
तरी पुढे तो धावतो

पहा कसा कविराजा 
चुरूचुरू बोलतोय
काव्य आपले ऐकून
आपणच डोलतोय

म्हणे करूनी उड्डाण
चंद्रसू्र्य मी धरीन
म्हणे देवादिकांनाही
हतबल मी करीन

शब्द एकावर एक
उभा राहिला मनोरा
सुकं निर्माल्य वेचून
फुलविला हा फुलोरा

लोक म्हणती कविता
थिजलेली विझलेली
लंगोटीतून निघाली
म्हणून ती भिजलेली

थांबवा ही क्रूर टीका
करू नका उपरोध
माझ्या बाळाची कविता
जरी असे बाळबोध
 

बहाणा

का अबोला का दुरावा
क्रोध का इतुका करावा
दाखवी हासून खुदकन्
प्रीतिचा अपुल्या पुरावा

मित्र माझे घे म्हणाले
घेतली दो थेंब दारू
खून चोरी मी न केली
तू नको लाठी उगारू

चूक माझी भूल माझी
काय प्रायश्चित्त घेऊ
एक प्याला जास्त झाला
नको स्वर्गी सूत नेऊ

बोल की डार्लिंग मजशी
मौन करते मज दिवाणा
चल हिऱ्याचे टॉप्स आणू
प्रीतिचा असली बहाणा

काठी

तामीळ भाषेत हिपहॉप आणि पंजाबीत रॅप
पाश्चात्यांच्या संस्कृतीची फिट्ट बसली कॅप
मराठीला विसरा आता, इमोजीत बोला
ओतून टाका सरबतं, उघडा कोका कोला

फेकून द्या ते लेंगे-सदरे, चढवा टाईट जीन्स
उसळ मिसळ काय खाताय, या घ्या मेक्सिकन बीन्स
चिवडा लाडू बेचव खाणे, हवा चाॅकलेट केक
मटण, वडे... ई! जुनाट डिशेस्, हवे रिबआय स्टेक

नव्या जमान्याचे रसिक, नवी सेन्सिबिलिटी
संवेदनक्षमता केव्हाच मेली, आली व्हल्नरेबिलिटी
फाडफाड इंग्लिश बोलून मारा इंप्रेशन
आपल्या भाषेत र्हिदम नाही, नाही एक्स्प्रेशन

फ्रोझन पीज, फ्रोझन चिकन, थिजलं सर्व काही
पश्चिमेच्या पावसामध्ये भिजलं सर्व काही
भ्रष्ट नक्कल करता करता बुद्धी झाली नाठी
आंधळ्याच्या हाती आली लाल पांढरी काठी

पोतराज

फिरवा चाबूक हाणा रट्टे
आपल्याच पाठीवर पाडा घट्टे

नखांनी काढा बाहेर आतडी
आपल्याच हातांनी लोंबवा कातडी

आपणच लांडोर आणि आपणच मोर
आपणच साव आणि आपणच चोर

आपल्याच पराक्रमांची आपणच गा गाथा
आपल्याच ढुंगणावर आपल्याच खा लाथा

तुमच्यावरील अन्यायाला देताय तुम्हीच पुष्टी
आपलीच बुबुळे उचकटण्याची कुठली ही दूरदृष्टी?

सर्वव्यापी परिवर्तनाची टळते आहे वेळ
आणि तुम्ही चालवलाय डोंबार्याचा खेळ

खणखण खणखण थाळी वाजवून
तुमची मुलं न्याय मागतायत

वरती आलिशान ग्यालरीत बसून
शेठजी तुमची गंमत बघतायत!

करप्शन

घाव, रक्त, लचके, तुकडे
विखरून टाका इकडे तिकडे
द्वेष, वीर्य, विष, विषय
आता राहिला तेवढाच आशय

इतकं का आपलं आयुष्य
बीभत्स झालं आहे?
की सौंदर्य, कौमल्य, मार्दव
सगळं मरून गेलंआहे?

अजूनही तोच सूर्योदय 
जगाला उजळून टाकतो ना?
अजूनही तोच वळीवपाउूस
जमिनीची तगमग झाकतो ना?

आपल्या गरजा झाल्यात भौतिक
निसर्गाचं कसलं मेलं कौतिक?
कुरूप, विकृत, तेवढंच आता विकतं
सुंदर, सुरूप काय, भाराभर पिकतं!