तुझ्या जळत्या सू्र्याच्या उन्हात उभं केलंस मला तर मी होईन एक वटवृक्ष आणि देईन माझ्या सावलीत विसावा कोण्या एका थकलेल्या वाटसरूला तुझ्या शक्तिशाली हातोड्याचे प्रहार केलेस माझ्यावर तर मी होईन एक शिल्प आणि देईन अपूर्व आनंदाचं लेणं कोण्या एका उत्सुकलेल्या रसिकाला तुझ्या कुंभाराच्या भट्टीत खुपसून भाजलंस मला तर मी होईन एक मृत्कलश आणि माझ्या पाण्यातून देईन पुनर्जीवन कोण्या एका आसुसलेल्या तृषार्ताला तुझ्या सोनाराच्या मुशीत ओतून वितळवलंस मला तर मी होईन एक दागिना आणि माझ्या लखलख झळाळीने सजवीन कोण्या एका कोवळ्या नववधूला तुझ्या विणकराच्या मागात बांधून ताणलंस मला तर मी होईन एक उपरणं आणि माझ्या ऊबदार मायेने झाकीन कोण्या एका विकलांग वृद्धाला मला या आयुष्याचं वरदान दिलंस मोठी कृपा केलीस माझ्यावर आता माझ्या आयुष्याला अर्थाचं दान दे नाहीतर मला सांग, ह्या माझ्या जगण्याचा काय उपयोग? आणि कोणाला?
Sacrifice
आग*
कुठली आग जळतेय तुझ्या अंतरंगात? संध्याकाळी शुभंकरोति म्हणणाऱ्या इटुकल्या घरातल्या मिणमिण पणतीतली आग? काकड आरतीच्या वेळी भक्तजनांना आळवून आमंत्रण देणाऱ्या शांत लामणदिव्यातली आग? आकाशातल्या तार्यांना वाकुल्या दाखवत लुकलुक उडणाऱ्या काजव्यातली आग? वादळी समुद्राच्या लाटांवर लटपटणार्या होड्यांना दिशा दाखवणार्या दीपगृहातली आग? राखेतून जन्मलेल्या मानवाची परत राखेकडे रवानगी करणारी स्मशानातली आग? अनंत अणुस्फोटांच्या यज्ञात स्वतःची आहुती देऊन आपल्या जगाला उजळून टाकणाऱ्या सू्र्यातली आग? सांग मला... कुठली आग जळतेय तुझ्या अंतरंगात?
कोण तू?*
कोण तू? वाऱ्यावर उडत आलेल्या सुकल्या पानाला मी विचारलं मी तुझा भूतकाळ, ते म्हणालं वसंत आणि ग्रीष्माबरोबर माझे दिवस संपले आता शिशिराबरोबर माझाही अंत होईल कोण तू? खिडकीत टपकलेल्या चिमणीला मी विचारलं मी तुझं भविष्य, ती म्हणाली मी जाणार उडून दूरदेशी आणि पाहणार तू कोण होणार आहेस कोण तू? उंबरठयावर धावण्याऱ्या मुंगीला मी विचारलं मी तुझं वर्तमान, ती म्हणाली मी थांबून गप्पा मारल्या असत्या तुझ्याशी पण आपणा दोघांना खूप कामं आहेत ना? कोण तू? कोनाड्यात तेवण्याऱ्या मेणबत्तीला मी विचारलं मी तुझं आयुष्य, ती म्हणाली जाणाऱ्या प्रत्येक क्षणाबरोबर मी कमी कमी होतेय पण मला जळत रहायला हवं तुला सगळं दिसावं म्हणून