सोनचाफा

पुन्हा एकदा
घड्याळाचे काटे सरसर मागे फिरावे
कॅलेंडरच्या पानांचे कागद भुर्र उडून जावे
अन् एक क्षणभर आपण परत प्रेमात पडावे…

पुन्हा एकदा
पाच बाराची फास्ट लोकल थांबावी
गर्दीत तुझी जॅार्जेटची साडी दिसावी
अन् छातीतली धडधड साऱ्या अंगात भिनावी

पुन्हा एकदा
रिकाम्या बसस्टॅापवर चिटपाखरू नसावे
किती उशीर केलास रे? म्हणून तू रुसावे
अन् मी हात हाती घेताच तू खुदकन हसावे

पुन्हा एकदा
दीड रुपयाची कॅाफी दीड तास पुरवावी
अनिश्चित भविष्याची इंद्रधनुष्ये रंगवावी
अन् बोलून होण्याआधी तुला घरची ओढ लागावी

पुन्हा एकदा
जुन्या चौपाटीवर बसून नवा सूर्यास्त निरखावा
ओल्या वाळूवर आपल्या नावांचा कित्ता गिरवावा
अन् भरतीच्या लाटेत आपला किल्ला वाहून जावा…

पुन्हा एकदा
मान वर करून तू माझ्या डोळ्यांत पहावे
तुझ्या सौंदर्याच्या जादूने मी मंत्रमुग्ध व्हावे
अन् तुझ्या जागी सोनचाफ्याचे फूल उमलावे