पाणबुड्या

सक्तीच्या एकांतवासात
मी होतो एक पाणबुड्या
आणि माझ्या मनातल्या
आठवणींच्या सागरात
मारतो खोल सूर…

आठवणीतले अनुभव
कडूगोड चाखलेले
धडपडून दोन्ही गुढघे
चिखलाने माखलेले
जसे जडजवाहीर
सागरतळी विखुरलेले

आठवणीतले सगेसोयरे
नातीगोती, चालीरीती
ज्यांना सोडून एके काळी
आयुष्याचा अर्थ शोधलेला
एक अमोल खजिना
अस्तित्वाच्या गाळात गाडलेला

आठवणीतले संगीसाथी
काही जुने काही नवे
काही जीव लावून जोपासलेले
काही आपोआप सापडलेले
कांतिमान मोत्यांसारखे
बंद शिंपल्यांत कोंडलेले

आठवणीतली प्रेमकहाणी
धडधडत्या हृदयांनी ऐकलेली
वचने दिलेली अन् घेतलेली
काही पाळलेली, बरीच मोडलेली
जशी अस्सल सोन्याची नाणी
कोणा चाच्याने पुरून ठेवलेली

आठवणींच्या सागरात
नेतो मी स्वत:ला खूप खोलवर
आणि मग जीव गुदमरला की
येतो परत वर ह्या कोरड्या हवेत
आणि घेतो आणखी एक
एकाकी श्वास…

माणूस

असा कसा तू माणूस | डोळे असून आंधळा
हात असून दुर्बळ | पाय असून पांगळा

असा कसा तू माणूस | सुखे भोगून दुखला
म्हणे माझे नाही कोणी | आप्त असून एकला

असा कसा तू माणूस | राजवाड्यात बेघर
सुखी खाऊनपिऊन | परी दुखणी दुर्धर

असा कसा तू माणूस | पैका असून गरिबी
जग लेवून पायाशी | म्हणशी मी कमनशिबी

असा कसा तू माणूस | शाळा शिकून अज्ञान
मोठा इमानी चाकर | स्वत:शी तू बेइमान

असा कसा तू माणूस | करी अर्थाचा अनर्थ
असे अंगी दैवी शक्ती | तरीही तू असमर्थ

असा कसा तू माणूस | चुकला रे तुझा नेम
तीच खरी माणुसकी | देई इतरां जी प्रेम

ऊठ जाग रे माणसा | डोळे उघड सताड
आत येऊदे उजेड | ऊठ उघड कवाड

पिवळी पाने

(माझा एक कविमित्र, राम, ५ डिसेम्बर २०२० रोजी आम्हां सर्वांना सोडून गेला, ही बातमी ऐकल्यावर झालेली कविता. रामच्या ब्लॉगचे शीर्षक ‘Yellow Leaves’ असे आहे. )

पिवळी पाने
झालो आता
सारे आपण

चिकटून राहतो
सुकल्या फांदीस
ह्या आशेवर की
येऊ घातलेला
वाऱ्याचा झोत
शेवटचा न ठरो

एकदा पडलो
फांदीवरून की
जाऊ भरकटत
मग कोण जाणे
कधी कोण कोठे
कोणाला भेटणार?

पिवळी पाने
अन् थकली मने
आठवतायत
हिरव्या आठवणी
तरुणपणीच्या
वसंतातल्या

त्या आठवणी
आता देतायत चेतना
सुकल्या फांदीस
चिकटून रहायला
आणखी एक दिवस

समयसागर

पाहतांना मजकडे
माझा मला मी पाहतो
जीवनाच्या दर्पणातुन
स्वत्व मी धुंडाळतो

एकदा जन्मूनही मी
खूप वेळा जन्मलो
प्रेमि मजला हरवुनी मी
विरहि मजला गवसलो

एक जीवन जगुनिया
हे संपले नाही जिणे
वर्षले आभाळ तरिही
उतरली नाहित उन्हे

मरण देखिल एकदा
येउनी भागेल का?
दाह त्या मंत्राग्निचा
माझ्या मना लागेल का?

जोवरी तुझिया मनातुन
मत्स्मृती विरणार नाही
तोवरी मी ह्या जगातुन
संक्रमण करणार नाही

होशील जेव्हा चालती
तू नाव माझे विसरुनी
हा निरामय समयसागर
घेईल मजला शोषुनी

विलीन

वाटे आज काही । लिहावे सतर्क
पिळूनिया अर्क । वास्तवाचा

उपमा उत्प्रेक्षा । शाब्दिक गजरे
दिसती साजरे । पानावरी

शब्दपूजेमध्ये । नाही काही अर्थ
खटाटोप व्यर्थ । कशापायी

सभोवती सारे । कृत्रिम हे जग
धरूनिया तग । राहवेना

जगी राजनीती । निष्ठुर निर्दय
मना नाटे भय । अनामिक

सखे नि सोबती । थोरले धाकटे
चालती एकटे । सैरभैर

डोळस आंधळे । खजिना शोधती
असूनिया हाती । सर्व काही

भौतिकाचे वेड । लागले या सर्वां
कोणाचीच पर्वा । कोणा नाही

गुरू आणि स्वामी । अध्यात्म गजर
ठेवूनी नजर । खिशावरी

जगी जे चालले । पाहतो तटस्थ
बसोनिया स्वस्थ । निराकार

काहीच वाटेना । दु:ख किंवा हर्ष
दोहींचाही स्पर्श । नाही मना

दोन्ही एक झाले । जीवन मरण
गेलो मी शरण । माझा मला

कां इथे रहावे । होऊनिया दीन
व्हावे बा विलीन । अनंतात