चालत रहा किर्र अंधाऱ्या रात्रीतून कारण तिच्या पलिकडे उद्याची सकाळ आहे पोहत रहा प्रक्षुब्ध सागराच्या लाटांवरून कारण त्यांच्या पलिकडे वास्तवतेचा किनारा आहे पाऊल ओढत रहा निर्दय शिशिराच्या बर्फातून कारण त्याच्या पलिकडे वसंताचा पहिला बहर आहे वाट काढत रहा दाट काटेरी जंगलातून कारण त्याच्या पलिकडे झुळझुळ वाहणारा झरा आहे आरोहत रहा उत्तुंग पर्वतांच्या शिखरांवरून कारण त्यांच्या पलिकडे एकांताचं अथांग सरोवर आहे भटकत रहा या निनावी शहराच्या रस्त्यांवरून कारण त्यांच्या पलिकडे घरातल्या चुलीची ऊब आहे कष्ट करत रहा आला दिवस जाईपर्यंत कारण त्याच्या पलिकडे समाधानाची संध्याकाळ आहे चालत रहा साऱ्या संकटांतून, विपत्त्यांतून, आपत्त्यांतून चालणं हेच आपलं आयुष्य थांबणं म्हणजे संपणं
Philosophy
बक्षीस*
हरिद्वारला गंगेच्या किनारी उभा राहून मी न्याहाळतोय हजारो भक्तांचं पापक्षालन आजपर्यंत कधीच नव्हतो इतका एकाकी मी ऐकतोय माझ्याच मनातलं बधिर आंदोलन अंगात येऊन घुमणारा तो संमोहित समूह त्या ज्वाळा, ते संगीत, तो नृत्यांचा जोश आणि त्यांच्या मध्यात वस्तुनिष्ठ, तर्कनिष्ठ मी ऐकतोय त्यांच्या मंत्रपठणाचा कर्कश जल्लोष टक लावून पाहतोय पण माझ्या लक्षात येईना ह्या नदीच्या पाण्यातली जादू मला कळेना की त्यात नाहतांना भक्त आपल्या वेदना विसरतो आणि चार शिंतोड्यांनी मांत्रिक दुर्धर व्याधी पांगवतो विचारमग्न मी, तिथे खिळून उभा राहतो आहे जे दिसतंय त्याच्या पलिकडचं अदृश्य दृश्य पाहतो आहे आणि अचानक लक्षात आलंय की मी इथं एकटा नाही गंगेचा हा खळाळता ओघ सांगू पाहतोय मला काही नदीतली एकेक गारगोटी माझ्याशी गप्पागोष्टी करतेय घाटपायऱ्यांच्या दगडविटांना देखील आता कंठ फुटतोय हळूहळू ह्या गंगेचं गुपित मला समजूं लागलंय भक्तिभावनेच्या शक्तीचं गणित मला उमजू लागलंय एक वेळ अशी येते की शास्त्राची कास सोडावी लागते एक वेळ अशी येते की अंतरीची आस ऐकावी लागते अंतरात्म्याला वस्तुनिष्ठा, तर्कशास्त्र वगैरे कळत नाही भक्तीची परीक्षा पास झाल्याशिवाय मुक्तीचं बक्षीस मिळत नाही
बुद्ध*
पिंपळाच्या पारंब्यांत लपलेला बुद्ध मला बरंच काही सांगून गेला शांत, स्तब्ध बसलेला बुद्ध माझं मौन भंगून गेला ज्यांनी जग घडवलं त्या पंचमहाभूतांत विलीन व्हावे त्यांच्या दृष्यात, गंधात, स्पर्शात स्वत:ला झोकून द्यावे उफाळलेल्या वादळाचा गदारोळ पाठीवर घेऊन हृदय शांत ठेवणाऱ्या महासागरासारखे व्हावे आसुसलेल्या जमिनीला पावसाचा आशीर्वाद देऊन मातृत्व बहाल करणाऱ्या मेघराजासारखे व्हावे आपल्या मखमली स्पर्शाने अंगावर शिरशिरी आणून पुष्पगंध पसरवणाऱ्या वार्याच्या झुळुकेसारखे व्हावे आपल्या घनदाट छायेत थकलेल्या वाटसरूला आसर्याची माया देणाऱ्या वटवृक्षासारखे व्हावे कधीकधी काही गोष्टी समोर आल्यावरच कळतात देऊळ दिसल्यावरच पाय भक्तिमार्गाकडे वळतात
उपयोग*
तुझ्या जळत्या सू्र्याच्या उन्हात उभं केलंस मला तर मी होईन एक वटवृक्ष आणि देईन माझ्या सावलीत विसावा कोण्या एका थकलेल्या वाटसरूला तुझ्या शक्तिशाली हातोड्याचे प्रहार केलेस माझ्यावर तर मी होईन एक शिल्प आणि देईन अपूर्व आनंदाचं लेणं कोण्या एका उत्सुकलेल्या रसिकाला तुझ्या कुंभाराच्या भट्टीत खुपसून भाजलंस मला तर मी होईन एक मृत्कलश आणि माझ्या पाण्यातून देईन पुनर्जीवन कोण्या एका आसुसलेल्या तृषार्ताला तुझ्या सोनाराच्या मुशीत ओतून वितळवलंस मला तर मी होईन एक दागिना आणि माझ्या लखलख झळाळीने सजवीन कोण्या एका कोवळ्या नववधूला तुझ्या विणकराच्या मागात बांधून ताणलंस मला तर मी होईन एक उपरणं आणि माझ्या ऊबदार मायेने झाकीन कोण्या एका विकलांग वृद्धाला मला या आयुष्याचं वरदान दिलंस मोठी कृपा केलीस माझ्यावर आता माझ्या आयुष्याला अर्थाचं दान दे नाहीतर मला सांग, ह्या माझ्या जगण्याचा काय उपयोग? आणि कोणाला?
आग*
कुठली आग जळतेय तुझ्या अंतरंगात? संध्याकाळी शुभंकरोति म्हणणाऱ्या इटुकल्या घरातल्या मिणमिण पणतीतली आग? काकड आरतीच्या वेळी भक्तजनांना आळवून आमंत्रण देणाऱ्या शांत लामणदिव्यातली आग? आकाशातल्या तार्यांना वाकुल्या दाखवत लुकलुक उडणाऱ्या काजव्यातली आग? वादळी समुद्राच्या लाटांवर लटपटणार्या होड्यांना दिशा दाखवणार्या दीपगृहातली आग? राखेतून जन्मलेल्या मानवाची परत राखेकडे रवानगी करणारी स्मशानातली आग? अनंत अणुस्फोटांच्या यज्ञात स्वतःची आहुती देऊन आपल्या जगाला उजळून टाकणाऱ्या सू्र्यातली आग? सांग मला... कुठली आग जळतेय तुझ्या अंतरंगात?
का*
तुला पाहणं म्हणजे केवळ माझ्या दृक्पटलावर होणारा किरणोत्सर्ग असेल तर मग मी दिवसभर का तुझ्या वाटेवर डोळे लावून बसतो? तुझे सूर म्हणजे केवळ माझ्या कर्णपटलावर पडणाऱ्या ध्वनिलहरी असतील तर मग तुझ्या गाण्यात का मला माझ्या आयुष्याची धून ऐकू येते? तुझा गंध म्हणजे केवळ माझ्या नासिकेला उत्तेजित करणारं रसायन असेल तर मग तुझ्या घनदाट केसांत लपतांना का मला स्वर्गात शिरल्यासारखं वाटतं? तुझा स्पर्श म्हणजे केवळ माझ्या बाह्यत्वचेला मिळणारी प्रेरणा असेल तर मग तुझ्या ओठांतल्या अमृतासाठी का माझे ओठ आसुसतात? शास्त्र मला सांगतं की तू केवळ माझ्या संवेदनेचा, अनुभूतीचा एक अंश आहेस तर मग तू माझ्या आत्म्याच्या अंतर्विश्वाला का व्यापून राहिली आहेस?
कोण तू?*
कोण तू? वाऱ्यावर उडत आलेल्या सुकल्या पानाला मी विचारलं मी तुझा भूतकाळ, ते म्हणालं वसंत आणि ग्रीष्माबरोबर माझे दिवस संपले आता शिशिराबरोबर माझाही अंत होईल कोण तू? खिडकीत टपकलेल्या चिमणीला मी विचारलं मी तुझं भविष्य, ती म्हणाली मी जाणार उडून दूरदेशी आणि पाहणार तू कोण होणार आहेस कोण तू? उंबरठयावर धावण्याऱ्या मुंगीला मी विचारलं मी तुझं वर्तमान, ती म्हणाली मी थांबून गप्पा मारल्या असत्या तुझ्याशी पण आपणा दोघांना खूप कामं आहेत ना? कोण तू? कोनाड्यात तेवण्याऱ्या मेणबत्तीला मी विचारलं मी तुझं आयुष्य, ती म्हणाली जाणाऱ्या प्रत्येक क्षणाबरोबर मी कमी कमी होतेय पण मला जळत रहायला हवं तुला सगळं दिसावं म्हणून
चिमूट
दोन बोटांच्या चिमटीत मी पकडलाय हा क्षण सोडला तर त्याचं फुलपाखरू भुर्रकन उडून जाईल की होईल त्याची माती चिमटीतल्या चिमटीतच आणि मिळेल माझ्या पायाखालच्या मातीला कोणास ठाऊक? आत्ताआत्तापर्यंतची ऊर्जा सामावली आहे या क्षणात चमचाभर मृगजळासारखी क्षणभरात... निघेल वरात पूर्त झालेल्या स्वप्नांची की पडतील सुकल्या फुलांच्या माळा भंगल्या ईर्षेच्या मढ्यावर कोणास ठाऊक? एक गोष्ट मात्र नक्की चिमूट उघडावीच लागेल लवकरच... आत्ताच