क्षण*

कुठल्या क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो?

एका वाह्यात झुळकेने तुझे घनदाट केस
तुझ्या चेहऱ्यावर विखुरले होते... तो क्षण?
की
मान हलवून पावसाचे थेंब तू तुझ्या
रेशमी केशपाशातून झटकले होतेस... तो क्षण?
की
मध्यरात्री स्वप्नातून जागी होतांना
तुझ्या चेहर्यावर एक मंद स्मित झळकून गेलं होतं... तो क्षण?
की
मी सारं जग जिंकणार, या आत्मविश्वासानं
तू घरातून निघाली होतीस... तो क्षण?
की
तू माझा हात घट्ट धरला होतास, जणू काही म्हणायला
माझा जीव तुझ्यावर सोपवतेय... तो क्षण?
की
शोकानं विव्हळून तू माझ्या कुशीत
आपलं डोकं गाडून टाकलं होतंस... तो क्षण?
की
मला कवेत घेऊन, धीर सोडू नकोस,
मी आहे ना इथेच? असं म्हटलं होतंस... तो क्षण?
की
अचानक माझ्या लक्षात आलं होतं
की तुझ्यामुळे माझ्या आयुष्याला अर्थ आलाय... तो क्षण?

सांग नं
ह्यांतल्या कुठल्या क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो?

चिमूट

दोन बोटांच्या चिमटीत
मी पकडलाय हा क्षण
सोडला तर त्याचं फुलपाखरू
भुर्रकन उडून जाईल
की
होईल त्याची माती
चिमटीतल्या चिमटीतच
आणि मिळेल माझ्या पायाखालच्या मातीला
कोणास ठाऊक?

आत्ताआत्तापर्यंतची ऊर्जा
सामावली आहे या क्षणात
चमचाभर मृगजळासारखी
क्षणभरात... 
निघेल वरात
पूर्त झालेल्या स्वप्नांची
की
पडतील सुकल्या फुलांच्या माळा
भंगल्या ईर्षेच्या मढ्यावर
कोणास ठाऊक?

एक गोष्ट मात्र नक्की
चिमूट उघडावीच लागेल
लवकरच...
आत्ताच