आता… कुठल्याही क्षणी… एका बीजाला भंगून दोन पानांची नवी पालवी बाहेर पडेल आता… कुठल्याही क्षणी… एक पक्षीण आपल्या पिल्लांच्या चोचीत त्यांचा पहिला घास भरवेल आता… कुठल्याही क्षणी… अंडं फुटून एक लहानगं कासव रांगत अफाट अपरिचित सागरात शिरेल आता… कुठल्याही क्षणी… फाटत्या कोशातून एक फुलपाखरू सौंदर्यसम्राज्ञीच्या थाटात उगवेल आता… कुठल्याही क्षणी… एक नवजात अर्भक टाहो फोडून आपलं आगमन जाहीर करेल आता… कुठल्याही क्षणी… एक खट्याळ बालक आरशातल्या स्वत:ला वाकुल्या दाखवेल आता… कुठल्याही क्षणी… एक युवक डोळ्यांत लाखो तारे नाचवीत प्रेयसीला प्रेमाचं गाऱ्हाणं घालेल आता… कुठल्याही क्षणी… एक जोडपं एकमेकांना घट्ट मिठी मारून भरल्या डोळ्यांनी निरोप घेईल आता… कुठल्याही क्षणी… एक वाटसरू नव्या मार्गावर आपली वाटचाल सुरू करेल आता… कुठल्याही क्षणी… कोण्या एकाचं जग कायमचं बदलून जाईल आता… कुठल्याही क्षणी… विश्वाच्या अपार चित्रपटावरचे हे अगणित चमत्कार तुला दिसतील आता… कुठल्याही क्षणी… तुझ्या डोळ्यांतली सगळी स्वप्नं साकार होऊन खुदकन हसतील