कसा येशील*

कसा येशील मला न्यायला?
चिडीचूप रात्रीच्या शांततेला
न चाळवता चवड्यांवर चालणाऱ्या
एखाद्या भुरट्या चोरासारखा
नकळत येशील का?

कसा येशील मला न्यायला?
ढोल ताशे लेझीम बडवत
झगमगत्या वरातीत मिरवणाऱ्या
लग्नघरातल्या पाहुण्यासारखा
वाजतगाजत येशील का?

कसा येशील मला न्यायला?
तुझा वेदनांचा खंजीर पाजळत
माझ्या अंगाची चाळणी करायला
सुपारी मिळालेल्या खुन्यासारखा
आग ओकत येशील का?

कसा येशील मला न्यायला?
माझ्या आयुष्याच्या चित्रपटाची
सगळी रिळं तुझ्या काखेत घेऊन
त्याचा शेवट कसा होणार हे मला
दाखवायला येशील का?

कसा येशील मला न्यायला?
धोतर, पगडी, शेंडी सांभाळत
पश्चात्तापाच्या प्रार्थना आळवत
मोक्षवचन देणाऱ्या भटासारखा
अनवाणी पायांनी येशील का?

कसा येशील मला न्यायला?
कधीही ये रे, अन् कसाही ये
पण हिंसा मात्र आणू नकोस
रोगराई म्हातारपण काहीही असो
नैसर्गिक शेवट देशील का?

कसा येशील मला न्यायला?
अक्राळविक्राळ यमदूत होऊन
तुझ्या तळपत्या तलवारीच्या
एकाच ओघवत्या घावाने
मला मोकळं करशील का?

कसा येशील मला न्यायला?
मला हवा तो सुंदर चेहरा होऊन
मला हवा तो मदतीचा हात होऊन
माझ्या जीवनाचा अंतिम क्षण
सार्थ करशील का?

जस्ट मी*

इज इट जस्ट मी
की उगवत्या सूर्याला पाहिल्यावर
तुमच्याही मनांत नव्या आशेचे किरण
कवडसा पाडतात?

इज इट जस्ट मी
की रात्रीच्या आकाशातल्या कोट्यावधी तारका
तुम्हालाही दूर अंतरिक्षात फिरायला
घेऊन जातात?

इज इट जस्ट मी
की पहाटे पाकळीवर पडलेलं दव पाहून
तुमच्याही डोळ्यांत अनामिक आनंदाश्रू
उभे राहतात?

इज इट जस्ट मी
की हिमालयाची बर्फाच्छादित शिखरं दिसताच
तुम्हालाही पाखरू होऊन आभाळात
उडावंसं वाटतं?

इज इट जस्ट मी
की खळखळ वाहणाऱ्या झऱ्याचं हसू ऐकून
तुम्हालाही आपल्या लहानपणची
कागदी नाव आठवते?

इज इट जस्ट मी
की सुकलेल्या झाडाची खरखरीत साल
तुम्हालाही तडक तुमच्या थकलेल्या आजीच्या
हातांकडे नेते?

इज इट जस्ट मी
की दिवसभर होणारे हे सारे साक्षात्कार
तुम्हालाही आयुष्याच्या अद्भुततेची
आठवण करून देतात?

कसे राहाल?*

सांगा, कसे राहाल?

आदर्शवादी राहाल
तर कोठे जायचे आहे ते तुम्हाला समजेल

व्यवहारी राहाल
तर तेथे का जायचे आहे ते तुम्हाला उमजेल

दूरदृष्टीने राहाल
तर तुमचे गंतव्य स्थान कायम तुमच्या नजरेत राहील

युक्तिबाज राहाल
तर तुम्हाला तेथे पोहोचण्याचे नवे मार्ग मिळतील

शिस्तबद्ध राहाल
तर तुम्ही मार्गावर अविरत प्रगती करीत राहाल

संतुलित राहाल
तर निसरड्या वाटेवर तुमचं पाऊल घसरणार नाही

सहनशील राहाल
तर वाटेतले अडथळे तुम्हाला निराश करणार नाहीत

कनवाळू राहाल
तर तुमचे सहयात्री तुमच्या मदतीला येतील

सहानुभूतिशील राहाल
तर तुमचे साथी तुमच्या संगतीने चालतील

प्रामाणिक राहाल
तर तुमची यशे आणि अपयशे तुम्हाला स्पष्ट दिसतील

सत्यवचनी राहाल
तर लोक तुमच्या शब्दांचा आदर राखतील

काटकसरी राहाल
तर तुम्ही आपल्या पृथ्वीकडून आवश्यक तेवढेच घ्याल

कृतज्ञ राहाल
तर तुमची सारी सत्कृत्ये सेवाभावाने होतील

एकाग्र राहाल
तर तुमचे ध्यान पुढच्या मार्गावर केंद्रित राहील

प्रबुद्ध राहाल
तर तुमचा मार्ग घन्या अंधारातही ज्ञानदीपांनी उजळता राहील

आता सांगा, कसे राहाल?

उमाळा*

इच्छांची इच्छाच संपून गेलीय
हव्यासांचा हव्यासही निवळलाय
गरजांची गरजही राहिली नाहीये
आता मला बोचतंय हे निष्फळ औदासीन्य

कामनांची कामनाच होत नाहीये
भूक तहानही पार पळालीय
कल्पनांची कल्पनाही उरली नाहीये
आता फक्त उरलंय हे शापित औदासीन्य

आकांक्षांची आकांक्षा अदृश्य झालीय
विरहाचा विरहही विरून गेलाय
झुरण्यासाठीचं झुरणंही झरलंय
आता मला जाळतंय हे जळतं औदासीन्य

तल्लफेची तल्लफ तडीपार झालीय
वासनांच्या वासनेची वासलात लागलीय
हुरहुरींची हुरहूरही हरवून गेलीय
राहता राहिलंय हे अमर्याद औदासीन्य

ओढींची ओढही ओसरून गेलीय
खाजेची खाजही खूप कमी झालीय
कंटाळ्याचाही कंटाळा आलाय
आता मला पिडतंय हे असह्य औदासीन्य

आता मी शोधतो आहे
एक लालसा, एक उद्युक्ती, एक चेतना
एक क्षुधा, एक उत्सुकता, एक प्रेरणा

माझ्या उदास मनाला
आता हवा आहे एक नवा ध्यास
एक नवा उमाळा

चालत रहा*

चालत रहा
किर्र अंधाऱ्या रात्रीतून
कारण तिच्या पलिकडे
उद्याची सकाळ आहे

पोहत रहा
प्रक्षुब्ध सागराच्या लाटांवरून
कारण त्यांच्या पलिकडे
वास्तवतेचा किनारा आहे

पाऊल ओढत रहा
निर्दय शिशिराच्या बर्फातून
कारण त्याच्या पलिकडे
वसंताचा पहिला बहर आहे

वाट काढत रहा
दाट काटेरी जंगलातून
कारण त्याच्या पलिकडे
झुळझुळ वाहणारा झरा आहे

आरोहत रहा
उत्तुंग पर्वतांच्या शिखरांवरून
कारण त्यांच्या पलिकडे
एकांताचं अथांग सरोवर आहे

भटकत रहा
या निनावी शहराच्या रस्त्यांवरून
कारण त्यांच्या पलिकडे
घरातल्या चुलीची ऊब आहे

कष्ट करत रहा
आला दिवस जाईपर्यंत
कारण त्याच्या पलिकडे
समाधानाची संध्याकाळ आहे

चालत रहा
साऱ्या संकटांतून, विपत्त्यांतून, आपत्त्यांतून
चालणं हेच आपलं आयुष्य
थांबणं म्हणजे संपणं

कधीतरी*

एक कविता… जी लिहायची राहून गेलीय
एक कविता… जी लिहिण्याचं धारिष्ट्य होत नाहीय
एक कविता… जी माझ्या आत्म्याला झोंबतेय
एक कविता… जी मला रात्रभर जागं ठेवतेय

अशी कविता… जिच्यात माझी माणुसकी भरलीय
अशी कविता… जिच्यात माझी विचारसरणी भिनलीय
अशी कविता… जिच्यात माझी अरक्षितता दिसतेय
अशी कविता… जिच्यात माझी प्रत्येक जखम धसतेय

ती कविता… जिने माझ्या मनाचा अंतराय शोधला
ती कविता… जिने माझ्या मनाचा गाभारा उजळला
ती कविता… जिने माझ्या मनातल्या ज्वाळा विझवल्या
ती कविता… जिने माझ्या मनातल्या वेदना शमवल्या

ज्या कवितेत… मी शून्यात डोकावून पाहिलं
ज्या कवितेत… मी दृष्टिहीनतेचं दुःख साहिलं
ज्या कवितेत… मी माझाच मला न्याहाळत राहिलो
ज्या कवितेत… मी आरशातल्या स्वतःला कुरवाळत राहिलो

त्या कवितेत… मी तुला बहाल केलेल्या यातना हव्या
त्या कवितेत… मी तुझ्यावर लादलेले अन्याय हवे
त्या कवितेत… माझा अप्पलपोटेपणा आणि ध्यास हवा
त्या कवितेत… माझ्या अहंकारितेचा उपहास हवा

कधीतरी… मी स्वतःला निरखण्याचं धैर्य गोळा करणार
कधीतरी… मी उजळ माथ्याने या जगात फिरणार
कधीतरी… मी माझ्या स्वत्वाला उघडं आभाळ दाखवणार
कधीतरी… मला आतून पोखरणारी ती कविता मी लिहिणार

समाधी*

हे कसलं वेड लागलंय मला?
का बेबंद झालंय माझं मन?
सहजपणे मी भटकतो आहे
वास्तवामधून कल्पनेकडे

हे कसलं वेड लागलंय मला?
गरगर फिरतंय माझ्या मनातलं होकायंत्र
अथांग अंतरिक्षात हिंडतोय मी माझं गीत गात
नक्षत्रांचा वद्यवृंद साथीला घेऊन

हे कसलं वेड लागलंय मला?
माझं स्वत्व झालंय समुद्रतळासारखं शांत
त्याच्या पृष्ठभागावर असोत कितीही लाटा
खोलवर मी झुलतोय समुद्रफुलांसमवेत

हे कसलं वेड लागलंय मला?
शोधतोय मी माझ्याच मनाची अपार  क्षितिजं
अबाधित, निश्चिंत, निरामय होऊन
विहरतोय मी स्वतःच्या अंतरावकाशात

हे कसलं वेड लागलंय मला?
पार निवळून गेल्या आहेत साऱ्या भावना
विरल्यात साऱ्या वेदना, सुखदुःखांनीही काढलाय पळ
नको आता काही उपाय, नको दिलासा,नको सांत्वन

हे कसलं वेड लागलंय मला?
तू आणि मी यांतला फरकही मला कळेना
कसलीच तमा राहिली नाही मला आता
सत्य काय अन् मिथ्य काय हेही आकळेना 

हे कसलं वेड लागलंय मला?
कशाने झालोय मी असा... अनुभवातीत, अतींद्रिय, अमर्याद?
हीच का ती ध्यानस्थ, चिंतनशील अवस्था... ती समाधी
बुद्धाला सुद्धा जिची वर्षोनवर्षं वाट पहावी लागली?

आता*

आता… कुठल्याही क्षणी…
एका बीजाला भंगून दोन पानांची नवी पालवी बाहेर पडेल
आता… कुठल्याही क्षणी…
एक पक्षीण आपल्या पिल्लांच्या चोचीत त्यांचा पहिला घास भरवेल

आता… कुठल्याही क्षणी…
अंडं फुटून एक लहानगं कासव रांगत अफाट अपरिचित सागरात शिरेल
आता… कुठल्याही क्षणी…
फाटत्या कोशातून एक फुलपाखरू सौंदर्यसम्राज्ञीच्या थाटात उगवेल

आता… कुठल्याही क्षणी…
एक नवजात अर्भक टाहो फोडून आपलं आगमन जाहीर करेल
आता… कुठल्याही क्षणी…
एक खट्याळ बालक आरशातल्या स्वत:ला वाकुल्या दाखवेल

आता… कुठल्याही क्षणी…
एक युवक डोळ्यांत लाखो तारे नाचवीत प्रेयसीला प्रेमाचं गाऱ्हाणं घालेल
आता… कुठल्याही क्षणी…
एक जोडपं एकमेकांना घट्ट मिठी मारून भरल्या डोळ्यांनी निरोप घेईल

आता… कुठल्याही क्षणी…
एक वाटसरू नव्या मार्गावर आपली वाटचाल सुरू करेल
आता… कुठल्याही क्षणी…
कोण्या एकाचं जग कायमचं बदलून जाईल

आता… कुठल्याही क्षणी…
विश्वाच्या अपार चित्रपटावरचे हे अगणित चमत्कार तुला दिसतील
आता… कुठल्याही क्षणी…
तुझ्या डोळ्यांतली सगळी स्वप्नं साकार होऊन खुदकन हसतील

दिवस*

एखादा दिवस कसा छान उगवतो
हास्य, आनंद आणि रोमांच घेऊन येतो
एखादा दिवस मला एकाकी करतो
ओळखीच्या चेहऱ्यासाठी माझा जीव तरसतो

एखाद्या दिवशी सूर्य तळपतो
एखाद्या दिवशी अंधार पसरतो
एखादा दिवस हरिणीसारखा बागडतो
एखाद्या दिवशी चालता पाय रखडतो

एखाद्या दिवशी माझी कल्पना भरारते
एखाद्या दिवशी सारेच धोक्याचे वाटते
एखाद्या दिवसात नवजात बालकाचे कुतूहल दिसते
एखाद्या दिवशी जग धुरकट धुके पांघरून बसते

एखाद्या दिवशी ज्योत तेवत उजळत असते
एखाद्या दिवशी पणती शांत होते, विझते
एखाद्या दिवशी ठिणगी पडते, आग भडकते
एखाद्या दिवशी चितेतली राख मनी वसते

दिवस उगवतात, दिवस मावळतात
रोज आपल्यासाठी नवी भेट घेऊन येतात
राग, लोभ, प्रेम, द्वेष - नवा दिवस, नवी भावना
रे उद्याच्या दिवसा, तू काय आणशील, सांग ना!

मैया*

वितळणाऱ्या हिमनदीतून
पारदर्शक पाण्याच्या थेंबांचा
टिपटिप पडणारा मोतीसर

खडककड्यांच्या विशाल वक्षावर
रुळणारे, वळणारे, खेळणारे
तिच्या प्रवाहाचे चकाकते चंद्रहार

शाळा सुटल्याच्या आनंदाने
खळखळून हसणाऱ्या, नाचणाऱ्या
बालिकांसारखे ते अवखळ ओढेनाले

असहाय्य भक्ष्याच्या शोधात 
सरपटणाऱ्या अजगरासारखा
तिचा बलदंड, गतिमान, भयानक ओघ

एकमेकांना पाहताच धावून
गळामिठीत आपलं स्वत्व अर्पण करणाऱ्या
प्रेमिकांसारखे तिचे संगम

शांत, प्रसन्न, विपुल, विचारशील
गावांतून, शहरांतून वळणे घेत
गावकऱ्यांच्या उपेक्षेचे असंख्य कलंक भाळी घेऊन

दैनंदिन आरत्यांचा कर्कश जल्लोष
सहिष्णुतेने सहन करीत
संथ वाहणारं तिचं विशाल पात्र

वळणावळणावर नाव बदलणाऱ्या
हिमालयातल्या त्या नदीची
ही अनेक रूपं मी पाहिली आहेत

पण तिच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या तिच्या लेकरांना 
एकाच नावाने तिची ओळख आहे…
मैया