काही बोलू नको

(नाज़िश शाह ह्यांच्या एका सुंदर हिंदी कवितेचा अनुवाद. हिंदी कविता खाली प्रतिकृत केली आहे.)

काही बोलू नको
पुरे… आता काहीच बोलू नको

शब्दच आहेत जे दगा देतात
विश्वासघात करतात
अनर्थाचा वर्षाव करतात
शब्दांना राहूदे म्यानातच
नाहीतर तलवारीचा वार होऊन
ते तुला खुनी बनवून टाकतील

शांततेला आत्मसात कर
बोलायचे ते तुझ्या डोळ्यांना बोलू दे
तुला उलगडतील तुझी उल्लंघने
पण आधी हृदयाची धडधड थांबू दे

शेवटी आपण माणसे
आपला संताप तेवढा योग्य
इतरांच्या यातना हा दुराग्रह
कृत्रिम बतावणी ठरवून
ज्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात
उभे केले जाते विनाकारण

संतापाला शब्दरूप देऊ नको
येणाऱ्या लाटेला फुटू देऊ नको
संयमाचा कारावास तुझ्या नशिबी
अहंकाराचा प्याला घोटाघोटाने पी
तुझ्याकडे मागीन तसाच मीही वागीन
पण तूही थोडा वेळ विचार कर

काही बोलू नको
काही बोलू नको
पुरे… आता काहीच बोलू नको

***

कुछ ना कहो

कुछ ना कहो
बस, अब कुछ भी ना कहो
लफ़्ज़ ही हैं जो दग़ा देते हैं
बेवफा बनकर
कहर बरसते हैं
लफ़्ज़ को मयान में रहने दो
तलवार सा वार करके
तुम्हें क़ातिल करार देते हैं

ख़ामोशी इख़्तियार करलो
आँखों को ही बोलने दो
गलती का एहसास है लाज़िम
मगर धड़कन को संभलने दो

हैं तो हम महज़ इन्सान
ख़ुद की अझीयत है बजा
दूसरे का दर्द है ज़िद
एक बनावटी सा बहाना
जो कठगरे में खडा कर
बेवजह ही इल्ज़ाम दे

गुस्से को लफ़्ज़ का इज़हार ना दो
लहर उठतेही क़ाबू कर लो
असीर-ए-ज़ब्त ही ग़र है तकदीर
तो अना को घूॅंट घूॅंट पी लो
मैं भी अमल पेरा रहूं और
तुम भी दम भर गौर करलो

कुछ ना कहो
कुछ ना कहो
बस, अब कुछ भी ना कहो

***

ऐलतीर पैलतीर

खऱ्याची दुनिया ऐलतीराला
स्वप्नीचं जग वसे पैलतीराला
माझ्या जिवाची ही नाव वल्हवीन
कधी ऐलतीरी, कधी पैलतीरी

सखे नि सोबती ऐलतीराला
जिवाचा जिवलग पैलतीराला
आठव मनात जपून ठेवीन
कधी ऐलतीरी, कधी पैलतीरी

घर आणि दार ऐलतीराला
प्रीतीचं पाखरू पैलतीराला
पंख पसरून उडून जाईन
कधी ऐलतीरी, कधी पैलतीरी

धन आणि दौलत ऐलतीराला
प्रेमाचा खजिना पैलतीराला
कुदळ घेऊन खोदून काढीन
कधी ऐलतीरी, कधी पैलतीरी

धर्म आणि कर्म ऐलतीराला
मर्मातली ठेव पैलतीराला
शोधात तिच्या मी भटकत राहीन
कधी ऐलतीरी, कधी पैलतीरी

भौतिक वास्तव ऐलतीराला
अंतर्विश्व माझे पैलतीराला
समुद्रप्रवाही वाहून जाईन
कधी ऐलतीरी, कधी पैलतीरी

कफल्लक

सतावी मनाला । भौतिक हव्यास
प्रगतीचा ध्यास । म्हणू तया

हिऱ्या माणकांची । बांधू पुरचुंडी
त्यांनी भरू खंडी । प्रलोभाची

दोनही हातांनी । केले धन गोळा
फेकला पाचोळा । चिरीमिरी

धनाने मनाचे । केले समाधान
विसरलो भान । कैफामध्ये

नक्षत्र चमक । सोने आणि चांदी
उतरेना धुंदी । वैभवाची

आयुष्य प्रवासी । दिसली माणसे
लक्ष मी फारसे । नाही दिले

सखे सोयरेही । सारखे सभोती
नाती अन गोती । हवी कोणा

नको जवळिक । मना भय वाटे
सारे हे भामटे । हावरट

एकला चाललो । आयुष्याची वाट
नको भेट गाठ । कोणाचीच

आज अचानक । भेटले प्रारब्ध
थांबलो मी स्तब्ध । थिजूनिया

आपल्याचि डोळां । पाहिले मरण
गेलो त्या शरण । कफल्लक

आव्हान

ही माझी कविता
इथे अन् आता जन्म घेतेय
कोण जाणे कुठल्या विश्वात ही संपेल?

ही माझी कविता
आहे अपार अथांग
आहे अमर्याद अनादि अनंत

ही माझी कविता
नाही सुखदायक दुःखहारक
नाही क्लेशशामक शोकविदारक

ही माझी कविता
नाही कोमट उदासीन शिळी वरणवाटी
ही आहे उसळत्या उकळत्या लाव्हाची रसरसती मूस

ही माझी कविता
आहे लखलखत्या सत्याची प्रदीप्त उल्का
ही कोरडे करून टाकील सारे मिथ्याचे सागर

ही माझी कविता
नाही एखाद्या विझत्या ताऱ्याचा अशक्त उजेड
ही आहे शंभर सूर्यांच्या भडकत्या विस्फोटाची अग्निशिखा

ही माझी कविता
नाही कोणा एकट्या शोषिताची असहाय आरोळी
हे आहे आम्हां सर्वांनी मिळून तुम्हांला दिलेलं आव्हान…

तो

तो एक आहे की अनेक आहे
तो सर्वस्व आहे की शून्यत्व आहे
तो वास्तव आहे की संभ्रम आहे
तो स्पष्ट आहे की धूसर आहे

तो कुणीकडे नाही आणि कुणीकडे आहे
तो कुठेच नाही की सगळीकडे आहे
तो तुमच्यात आहे की माझ्यात आहे
तो सत्यात आहे की मिथ्यात आहे

तो शरीरात आहे की मनात आहे
तो कल्पित आहे की अकल्पित आहे
तो वासना आहे की विरक्ती आहे
तो आशा आहे की नैराश्य आहे

तो प्रकाशात आहे की अंधारात आहे
तो रात्रीत आहे की दिवसात आहे
तो लांबी आहे की रुंदी आहे
तो तपस्विता आहे की धुंदी आहे

तो तर्क्य आहे की अतर्क्य आहे
तो शक्य आहे की अशक्य आहे
तो पाश आहे की मुक्ती आहे
तो भीती आहे की शक्ती आहे

तो दृश्य आहे की अदृश्य आहे
तो स्पृश्य आहे की अस्पृश्य आहे
तो चर आहे की अचर आहे
तो प्रश्न आहे की उत्तर आहे

समजा तो हत्ती, आणि आपण सारे आंधळे
चाचपतोय त्याची सोंड, शेपूट अन् पाय
समजा ह्यातलं काहीच जर तो नसेल
तर मग सांगा, आता करायचं काय?

गाणी

स्वच्छ दिसते क्षितिज तरिही
वाट वाटे नागमोडी
रात्र आहे स्तब्ध तरिही
थरथरे लाटांत होडी

सहज सुंदर संधिकाली
नभ अचानक झाकळावे
इंद्रधनुचे रंग सगळे
काळिम्यापरि साकळावे

विश्व सारे शांत असता
कां मनी हुरहूर लागे
भैरवीला आळवीता
कुठुन बेसुर सूर लागे

स्मित मुखीचे कां विरावे
भान मनिचे कां ढळावे
हास्य होई अश्रु खळकन्
कां, मना नच आकळावे

पाहता मागे नि पुढती
जे नसे त्यास्तव झुरावे
हासतांना तोंड भरुनी
आसवांना कां स्मरावे

दुःख आणिक सौख्य दोन्ही
घडविती अपुली कहाणी
कधितरी गावे पवाडे
कधितरी गावी विराणी

नाचुदे आनंद ओठी
जरि भरे डोळ्यांत पाणी
वेदना विसरून अपुल्या
गुणगुणावी गोड गाणी