एकदा असाच हिंडत होतो आणि मला गुरुजी भेटले प्राथमिक शाळेतले ते दिवस डोळ्यांपुढून सरकून गेले चार खोल्यांची आमची शाळा आम्ही आणि आमचे गुरुजी तेराचा पाढा म्हणतानासुद्धा खदाखदा हसायला लावायचे “कुठे असतोस, काय करतोस हल्ली?” मी सांगितले, गुरुजी थक्क झाले म्हणाले, “खूप मोठा झालास रे, शाळेचं, आमचं सार्थक केलंस… चल घरी, मी इथे समोरच राहतो एक कप चहा तरी घेऊन जा!” कपाळीच्या आठीने आमचे स्वागत केले “बस रे…” म्हणून गुरुजी आत गेले “आज कोणाला घेऊन आलात? सगळेच यांचे माजी विद्यार्थी! लोकांना पण लाज नाही पाहा एक कप चहासाठी साले काहीही करतील!” चपला पायांत सरकवून निघालो खाली उतरलो, सिगरेट पेटवली आणि अचानक, का कुणास ठाऊक पण मला साऱ्या जगाची दया आली!
#marathi
एखादी कविता
एखादी कविता आर्त आसवांसारखी आपल्या डोळ्यांत उभी राहते एखादी कविता उन्मत्त कैफासारखी जागेपणी रंगीत स्वप्नं पाहते एखादी कविता सुंदर शिल्पासारखी ठाकून ठोकून घडवता येते एखादी कविता उंच मनोऱ्यासारखी मजल्यामजल्याने चढवता येते एखादी कविता बालमैत्रिणीसारखी दारामागे लपून वाकुल्या दाखवते एखादी कविता लंगडी घालत घालत पळपुट्या मनाचा पाठलाग करते एखादी कविता खेळकर प्रेयसीसारखी हळूच मागून येऊन आपले डोळे झाकते एखादी कविता लाजऱ्या नववधूसारखी हलक्याने एकेक पाऊल पुढे टाकते एखादी कविता प्रेमाच्या पान्ह्यासारखी मन भरून आलं की आपसूक स्त्रवते एखादी कविता निजलेल्या तान्ह्यासारखी मिटलेल्या डोळ्यांतून खुदकन हसते एखादी कविता पावसाळी पागोळ्यांसारखी टपटप पडून आपली बाग फुलवते एखादी कविता श्रावणी हिंदोळ्यासारखी झुलझुल झुलवून आपलं मन खुलवते एखादी कविता ज्वलंत निखाऱ्यासारखी अंतरंग जाळत राहते एखादी कविता भंगल्या हृदयासारखी सारी रात्र जागत राहते एक गुपित तुम्हांला सांगू का? जे कवी कोणालाच सांगत नाही कविता कवीला आपोआप होते त्याला ती “करावी” लागत नाही!
तळिरामाची गाथा
(तुकोबांची साष्टांग क्षमा मागून) बसे एकला मी । कसे मन मारू प्राशतो ही दारू । प्रातःकाळी घरात बसोनी । लागलीसे प्यास उचलतो ग्लास । आवडीने घरात बसोनी । जाहला उद्वेग पेगावरी पेग । रिचवितो घरात बसोनी । जाहलो मी दीन टाॅनिक व जिन । वाचवील घरात बसोनी । वाटते शरम घेतो थोडी रम । परतून घरात बसोनी । ओव्या ह्या गाईन साथीला वाईन । दोन थेंब संकटावरी या । एकच उपाय स्काॅच किंवा राय । घ्यावी थोडी आपत्तीपुढे या । हात मी टेकिला द्या थोडी टकीला । राॅक्सवरी लाॅकडाउनाने । जीव अर्धा झाला हवा पुरा प्याला । शॅंपेनचा कपाटामधोनी । दाविती वाकुल्या साऱ्या त्या बाटल्या । काय करू जरा जास्त होता । बायको ओरडे दिवस कोरडे । माझ्या भाळी तळीराम म्हणे । आज घ्या व्होडका उद्या राहील का । प्राणिमात्र
आयुष्य
असेही काही महाभाग जगतायत ज्यांचं इंजिन रुळांवरुन निखळलंच नाही आयुष्य त्यांना कधी कळलंच नाही अडीअडचणींच्या चिखलात घसरून ज्यांच्या अंगातलं चिरगूट मळलंच नाही आयुष्य त्यांना कधी कळलंच नाही भुकेलं खंगलेलं दारिद्र्य दिसताच ज्यांचं भरलेलं पोट ढवळलंच नाही आयुष्य त्यांना कधी कळलंच नाही अन्यायाच्या आसुडांचे फटके ऐकताच ज्यांचं रक्त त्वेषाने उसळलंच नाही आयुष्य त्यांना कधी कळलंच नाही प्रेमाची ओढ अनावर होताच ज्यांनी प्रेयसीला मिठीत आवळलंच नाही आयुष्य त्यांना कधी कळलंच नाही विरहाच्या वेदनांनी विकल होऊन ज्यांचं हृदय कधी विव्हळलंच नाही आयुष्य त्यांना कधी कळलंच नाही अंगणात खेळणाऱ्या मुलांच्या गलक्यात ज्यांनी आपलं हसू कधी मिसळलंच नाही आयुष्य त्यांना कधी कळलंच नाही थकलेलं सुकलेलं वार्धक्य पाहून ज्यांचं मन कणवेने कळवळलंच नाही आयुष्य त्यांना कधी कळलंच नाही संध्याकाळी समईच्या शांत उजेडाने ज्यांचं अंतरंग कधी उजळलंच नाही आयुष्य त्यांना कधी कळलंच नाही
चिंता
खरे पाहता वाहतो आज कालचाच वारा पण माझिया अंगाला येई का नवा शहारा खरे पाहता पडले आज कालचेच ऊन पण कसल्या विचारी मन माझे झाले सुन्न खरे पाहता आकाशी आज कालचेच ढग मग माझिया जिवाची का ही नवी तगमग खरे पाहता अजून वाहतात नद्या ओढे तरी का बरे माझ्याने टाकवेना पाय पुढे खरे पाहता कोकिळा गाते कालचेच गाणे पण माझिया मनाची तळमळ कोण जाणे खरे पाहता आजही कालचीच चांदरात तरी का माझे पाऊल अडखळे अंधारात खरे पाहता दिसांत बदलली नाही सृष्टी मग कोठल्या मळभी ढगाळली माझी दृष्टी खरे पाहता जगाला नाही आदि नाही अंत तरी पण माझ्या उरी का ही अनामिक खंत खरे सांगू? मला नाही कमतरता कशाची पण नारायणापरी चिंता करितो विश्वाची
पालवी*
कापून टाकाल माझी जीभ? कापा, पण तरीही माझ्या जळत्या जिवाचं हे गीत दशदिशांत गुंजत राहील कापून टाकाल माझे हात? कापा, पण तरीही माझ्या थोट्या हातांचे हे खुंट आभाळाला भिडत राहतील कापून टाकाल माझे पाय? कापा, पण तरीही माझ्या क्रांतिकारी आत्म्याची ही पावलं निरंतर चालत राहतील काढून घ्याल माझे हक्क? घ्या, पण तरीही माझं हे आंदोलन थांबणार नाही ते सुरूच राहील जनावर बनवाल मला? बनवा, पण म्हणून मी हे सारं मुकाट्यानं सहन करणार नाही पिंजऱ्यात डांबाल मला? डांबा, पण माझ्या संतापाचा अग्नी तुम्हाला जाळल्याविणा शमणार नाही अमानुष म्हणाल मला? म्हणा, पण त्यानं तुमची माणुसकी कधीच शाबीत होणार नाही संशयाची बीजं पेराल? पेरा, पण म्हणून सत्याला फुटलेली पालवी कोमेजणार नाही
गर्ता*
माझ्या ह्या वेडामुळे मला सत्य दिसतंय की सत्याकडे पाहून मला वेड लागलंय? माझ्या ह्या विषण्णतेमुळे मला जगाच्या यातना कळल्यायत की जगाच्या यातना साहून मी विषण्ण झालोय? माझा हा एकाकीपणा गर्दीतही मला अनोळखी करतोय की अनोळखी लोकांची ही गर्दी मला एकाकी करून टाकतेय? माझा हा स्वार्थीपणा तुला निर्दय व्हायला भाग पाडतोय की तुझ्या निर्दय वागण्याने मी आणखी स्वार्थी झालोय? माझी कल्पनाशक्ती लोपल्याने मला हा थकवा आलाय की माझ्या थकव्यामुळे माझी कल्पनाशक्ती शमलीय? इतकी दमलीयत माझी पाउलं ती अंतहीन चालण्यामुळे की एका ठिकाणी इतका वेळ थांबल्याने पाउलं चालणं विसरलीयत? हे अथांग अवकाश माझे रिक्त कोरडे डोळे निरखतंय की माझे डोळे निरखतायत त्या अथांग रिक्त अवकाशाची गर्ता?