चालत रहा किर्र अंधाऱ्या रात्रीतून कारण तिच्या पलिकडे उद्याची सकाळ आहे पोहत रहा प्रक्षुब्ध सागराच्या लाटांवरून कारण त्यांच्या पलिकडे वास्तवतेचा किनारा आहे पाऊल ओढत रहा निर्दय शिशिराच्या बर्फातून कारण त्याच्या पलिकडे वसंताचा पहिला बहर आहे वाट काढत रहा दाट काटेरी जंगलातून कारण त्याच्या पलिकडे झुळझुळ वाहणारा झरा आहे आरोहत रहा उत्तुंग पर्वतांच्या शिखरांवरून कारण त्यांच्या पलिकडे एकांताचं अथांग सरोवर आहे भटकत रहा या निनावी शहराच्या रस्त्यांवरून कारण त्यांच्या पलिकडे घरातल्या चुलीची ऊब आहे कष्ट करत रहा आला दिवस जाईपर्यंत कारण त्याच्या पलिकडे समाधानाची संध्याकाळ आहे चालत रहा साऱ्या संकटांतून, विपत्त्यांतून, आपत्त्यांतून चालणं हेच आपलं आयुष्य थांबणं म्हणजे संपणं
kavita
संदूक*
लहानपणी लपंडाव खेळतांना आता आपण कुणाला सापडणारच नाही ह्या भीतीने पोटात पडलेला खड्डा विहिरीत सूर मारतांना कोंडलेल्या श्वासातून झालेला स्वत:च्या मर्त्यतेचा पहिला साक्षात्कार तिनं नजरेनेच हो म्हटल्यावर अनावर आनंदित होऊन हृदयाने मारलेल्या कोलांट्याउड्या हिमालयाच्या पायथ्याशी झालेली आपण अणुरेणूहून सूक्ष्म आहोत ही अहंभाव हरवणारी जाणीव पौर्णिमेच्या चांदण्यात फिरतांना ओठांतून शब्द निघण्याआधीच हाताने हाताशी केलेलं अजब हितगूज त्यांनी शेवटचा श्वास घेतला आणि उच्छ्वास सोडलाच नाही त्या क्षणी शोकाने गदगद हललेलं अंग अधूनमधून माझ्या आठवणींची संदूक उघडून मी बसतो आणि आतली अमोल रत्नं परत निरखून पाहत असतो
नको ना*
त्या चिमणीसारखी थोडा वेळ छतात चिवचिवाट करून उडून जाऊ नको ना त्या धुक्यासारखी साऱ्या जगावर तुझ्या रहस्याची रजई पांघरून विरून जाऊ नको ना त्या वावटळीसारखी एखादं सोनेरी पान माझ्या दारात टाकून फिरून जाऊ नको ना त्या काजव्यासारखी घन्या अंधारात लुकलुक चित्रं काढून विझून जाऊ नको ना त्या इंद्रधनूसारखी आभाळाच्या पटलावर तुझे सात रंग शिडकून वितळून जाऊ नको ना त्या पौर्णिमेच्या चंद्रासारखी हजारो चेहरे उजळून मग एखाद्या ढगामागे लपून जाऊ नको ना ह्या प्रणयाच्या क्षणी माझ्या जिवाला अनावर ओढ लावून सोडून जाऊ नको ना