खरं सांगू का? ह्या कविता मी लिहीत नाही त्या स्वतःला लिहवून घेतात माझ्याकडून उभ्या राहतात माझ्या डोळ्यांत अश्रूंसारख्या आणि मग माझं कलम मारतं सूर माझ्या मनातल्या शाईच्या दौतीत खरं सांगू का? हे शब्द मी निवडत नाही ते स्वतःहून माझ्या समोर येतात पाखरांच्या सुंदर ओळींसारखे त्यांचा हा आकृतिबंध मी नाही घडवत - तो आपोआपच घडतो खरं सांगू का? एखाद्या कवितेत किती कडवी असतील हेही मला ठाऊक नसतं आता हीच कविता पाहा नं आणखी एक कडवं उरलंय असं माझी प्रेरणा मला खुणावून सांगतेय खरं सांगू का? कधीकधी असं वाटतं की आपणां सर्वांत सामावलेल्या वैश्विक धुळीचं असेल का हे एक रूप? नाहीतर मग मला झपाटून राहिलंय कधीकाळी काळात विलीन झालेल्या एखाद्या अनामिक कवीचं भूत?