
सावट

अरे उठलास का? दात घासलेस का? चहा ठेवलास का? माझा ओतलास का? कचरा ठेवलास का? डबे आणलेस का? आंघोळ केलीस का? कपडे धुतलेस का? वाळत घातलेस का? काढून आणलेस का? भाजी आणलीस का? स्वयंपाक केलास का? पाटपाणी घेतलंस का? ताटं वाढलीस का? भांडी घासलीस का? ओटा पुसलास का? दिवे लावलेस का? दिवे मालवलेस का? गाद्या घातल्यास का? दारं लावलीस का? दात घासलेस का? इतक्यात झोपलास का?
***
(अनुवादित कविता: कवयित्री नाझिश शाह यांच्या "गरीब की गुहार" या अतिशय सुंदर हिंदी कवितेचे मी केलेले मराठी रूपांतर)
आठ वाजता फर्मान निघालं बारा वाजता कुलपं लागनार जमीन हलली पावलाखाली आता नाही आपन घरी परतनार लाइनीला लागन्याची सवय तर व्हती पन बंद खोलीत किती येळ बसनार गल्लीतल्या कुत्र्यांस्नी जसं भेटतं तसं म्हनत्यात, तुमालाबी जेवन भेटनार आमची राहती जागा हिरावली भूक मिटवन्याची साधनं गमावली पोलीस पाडत्यात लाठ्यांचा पाऊस “बसा गपचूप, कशाला मस्ती गावाची गाव हाय पाचशे मैलांवर, नाही ट्रेन ना बस आन् बाॅर्डर हाय बंद, पकडा वाट परतीची” मुसमुसून आसवं सुकून गेली आरोळी कोरड्या जिभेला अडली आम्हाला घरी पाठवायची सोय का नाही केली? परदेशी राहनाऱ्यांना आनायला विमानं पाठवली जवा कोर्टानंबी आमची सुनावनी नाकारली तवा आम्ही पायीच गावाची वाट पकडली चपला जुती सारी पार घासून गेली चला सामान मुलंबाळं पाठुंगळीला घेऊ भूक लागली की कोरडी बिस्किटं खाऊ आलं मरन तर रस्त्यातच मरून जाऊ घरच्या आठवनीनं फार सतावलं कश्या ऱ्हात असत्याल माय अन् बाईल इथं ऱ्हायलो तर भुकेनंच मरनार न्हाई तर आम्हाला हा करोना घेऊन जाईल ट्रेन तर तुम्ही चालवनार न्हाई चालल्या तरी तिकिटाचे पैशे न्हाईत चला कसं तरी करून तिकीटही काढू पन तुम्ही कवा पाठवाल कोनाला म्हाईत चांगली थट्टा करताय राव आमची ट्रेनचे पैशे घेऊन वर कॅन्सल करताय आम्हाला बांधिलकीचे मजूर ठरवताय आन् वर परत मजुरी कायदा बदलताय तुम्हास्नी काय फरक, आम्ही जगलो किंवा मेलो रोगराई तुमची आन् जुलूम आमच्यावर म्हनं आम्ही खेडूत, गुन्हेगार, देशद्रोही गप ऱ्हात न्हाई आम्ही बंद खोलीत डांबल्यावर तुम्हीच आनली ही परदेशी रोगराई आम्ही टीबी, काॅलऱ्यानं मरतच हाओत रोगराईनं मेलो नाही तर भुकेनं आम्ही कुठल्याबी हालातीत मरतच हाओत आता कृपा करून आम्हाला मोकळं सोडून द्या तुम्ही बसा बंद खोलीत, आम्हाला जाऊन द्या ही रोगराई तर बाबा हाये सबब पुरानी गरिबी आन् श्रीमंतीची हाये ही कहानी