
सगळ्यांनाच आठवतं तसं आजोळ मलाही आठवतं आहे पन्नास वर्षं ओलांडून मन मला मागे पाठवतं आहे परीक्षा संपत आल्या की ओढ आजोळी जाण्याची सूर पारंब्या खेळण्याची रसाळ आंबे खाण्याची चौकात आलो की बोळाच्या शेवटी वाड्याचा दिंडीदरवाजा दिसे मामाच्या वाड्याचं दर्शन होताच माझ्या आनंदाला सुमार नसे धावत जाऊन अंगणात शिरतांच दरवाजा मला कवेत घेई “आलास? ये, दमला असशील!” त्याचा करकर आवाज येई दरवाज्याला महिरप होती झोकदार बोगनवेलीची मागल्या दारी रास पडायची प्राजक्ताची अन् अबोलीची गोठ्यामध्ये दहा गायी त्यांत एक तांबू गाय होती रोज सकाळी साखर घालून धारोष्ण दुधाची साय होती आजी सांगे तो दरवाजा एकदाच बंद झाला होता जेव्हा गांधीहत्येचा भीषण प्रसंग आला होता दरवाज्यातून वाजत गाजत जेवढ्या लग्नवराती गेल्या तटस्थपणाने दरवाज्याने तेवढ्याच अंत्ययात्राही नेल्या गोठा पडला, तांबू गेली तांबूची गोंडेदार शेपटी गेली मोडक्या वाड्यात एकटी राहून बिचारी आजीही शेवटी गेली वाड्याचा तो दरवाजा मी कधीच बंद पाहिला नाही तो दरवाजा केव्हाच गेला तो वाडाही राहिला नाही