हे कसलं वेड लागलंय मला? का बेबंद झालंय माझं मन? सहजपणे मी भटकतो आहे वास्तवामधून कल्पनेकडे हे कसलं वेड लागलंय मला? गरगर फिरतंय माझ्या मनातलं होकायंत्र अथांग अंतरिक्षात हिंडतोय मी माझं गीत गात नक्षत्रांचा वद्यवृंद साथीला घेऊन हे कसलं वेड लागलंय मला? माझं स्वत्व झालंय समुद्रतळासारखं शांत त्याच्या पृष्ठभागावर असोत कितीही लाटा खोलवर मी झुलतोय समुद्रफुलांसमवेत हे कसलं वेड लागलंय मला? शोधतोय मी माझ्याच मनाची अपार क्षितिजं अबाधित, निश्चिंत, निरामय होऊन विहरतोय मी स्वतःच्या अंतरावकाशात हे कसलं वेड लागलंय मला? पार निवळून गेल्या आहेत साऱ्या भावना विरल्यात साऱ्या वेदना, सुखदुःखांनीही काढलाय पळ नको आता काही उपाय, नको दिलासा,नको सांत्वन हे कसलं वेड लागलंय मला? तू आणि मी यांतला फरकही मला कळेना कसलीच तमा राहिली नाही मला आता सत्य काय अन् मिथ्य काय हेही आकळेना हे कसलं वेड लागलंय मला? कशाने झालोय मी असा... अनुभवातीत, अतींद्रिय, अमर्याद? हीच का ती ध्यानस्थ, चिंतनशील अवस्था... ती समाधी बुद्धाला सुद्धा जिची वर्षोनवर्षं वाट पहावी लागली?