माझ्या ह्या वेडामुळे मला सत्य दिसतंय की सत्याकडे पाहून मला वेड लागलंय? माझ्या ह्या विषण्णतेमुळे मला जगाच्या यातना कळल्यायत की जगाच्या यातना साहून मी विषण्ण झालोय? माझा हा एकाकीपणा गर्दीतही मला अनोळखी करतोय की अनोळखी लोकांची ही गर्दी मला एकाकी करून टाकतेय? माझा हा स्वार्थीपणा तुला निर्दय व्हायला भाग पाडतोय की तुझ्या निर्दय वागण्याने मी आणखी स्वार्थी झालोय? माझी कल्पनाशक्ती लोपल्याने मला हा थकवा आलाय की माझ्या थकव्यामुळे माझी कल्पनाशक्ती शमलीय? इतकी दमलीयत माझी पाउलं ती अंतहीन चालण्यामुळे की एका ठिकाणी इतका वेळ थांबल्याने पाउलं चालणं विसरलीयत? हे अथांग अवकाश माझे रिक्त कोरडे डोळे निरखतंय की माझे डोळे निरखतायत त्या अथांग रिक्त अवकाशाची गर्ता?