
मारक वारे वाहत होते
थंडी भलती पडलेली
भयाण रात्री सहा माणसे
शेकोटीशी बसलेली
जोराचा हिमसेक जाहला
विझू लागली आग तशी
होती मोजुन सहा लाकडे
मिळुनि त्यांकडे कशीबशी
एक म्हणाला मी का टाकू
आगित या माझी काठी
दुजा म्हणे माझा शेजारी
मरेल का माझ्यासाठी?
तिसऱ्यानेही विचार केला
हे तर परक्या धर्माचे
चौथा सज्जन म्हणे कां बरे
यांना फळ मम कर्माचे?
लक्ष्मीपति हे दिसती सारे
वदे आणखी एक गडी
कां आम्ही यांस्तवे मरावे
शेकोटित फेकून छडी?
पाच जणांपरि म्हणे सहावा
कां माझे लाकुड टाकू?
परोपकारी मी न एकला
यांपुढती मी कां वाकू?
जिवघेणा मग पडे गारठा
शेकोटी गेली विझुनी
प्रत्येकाच्या स्वार्थापायी
साही जण मेले थिजुनी
सहा माणसे विलया गेली
अप्पलपोट्या करण्यांनी
थंडीने ती नाही मेली
मेली थिजल्या हृदयांनी
(*James Patrick Kinney यांच्या The Cold Within या कवितेचे स्वैर रूपांतर)
खूपच छान. बऱ्याच दिवसांनी तुझी ही कविता मला आवडली. प्रत्येकाने स्वार्थाचं बघितला तर हे जग चालायचं कसं? पण तसं होत नाही. स्वार्थासाठी लोकं काहीही करतात याचा प्रत्यय आपल्या सगळ्यांनाच पदोपदी येत असतो, नाही का? छान शब्दात सत्य व्यक्त केलंस. अभिनंदन.
LikeLiked by 1 person
धन्यवाद समीर!
LikeLike
Wonderfully adapted!
LikeLiked by 1 person
Thanks so much Aseem!
LikeLike
वाह वा, सत्येन !! कमाल केलीस !!
मूळ कवितेचा इतका अप्रतिम भावानुवाद केलास, की स्थळकाळाचे बंधन तोडून ही कविता वैश्विक पातळीवर तू नेऊन ठेवलीस !!
मला तर वाटते, की “प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट !”
LikeLiked by 1 person
खूप खूप धन्यवाद भालचंद्र! तुझ्यासारख्या ज्ञानी आणि चोखंदळ रसिकाकडून आलेला अभिप्राय लाख मोलाचा! 🙏
LikeLike
सुंदर..सहज, लयबद्ध… आवडली!
LikeLiked by 1 person
धन्यवाद कुमार!
LikeLike
ईंग्रजी भावना खूप ताकदीने मराठी मधे आणली आहे. खूपच अर्थपूर्ण…..
LikeLiked by 1 person
धन्यवाद बलवंत!
LikeLike