थंडी*

मारक वारे वाहत होते
थंडी भलती पडलेली
भयाण रात्री सहा माणसे
शेकोटीशी बसलेली

जोराचा हिमसेक जाहला
विझू लागली आग तशी
होती मोजुन सहा लाकडे
मिळुनि त्यांकडे कशीबशी

एक म्हणाला मी का टाकू
आगित या माझी काठी
दुजा म्हणे माझा शेजारी
मरेल का माझ्यासाठी?

तिसऱ्यानेही विचार केला
हे तर परक्या धर्माचे
चौथा सज्जन म्हणे कां बरे
यांना फळ मम कर्माचे?

लक्ष्मीपति हे दिसती सारे
वदे आणखी एक गडी
कां आम्ही यांस्तवे मरावे
शेकोटित फेकून छडी?

पाच जणांपरि म्हणे सहावा
कां माझे लाकुड टाकू?
परोपकारी मी न एकला
यांपुढती मी कां वाकू?

जिवघेणा मग पडे गारठा
शेकोटी गेली विझुनी
प्रत्येकाच्या स्वार्थापायी
साही जण मेले थिजुनी

सहा माणसे विलया गेली
अप्पलपोट्या करण्यांनी
थंडीने ती नाही मेली
मेली थिजल्या हृदयांनी

(*James Patrick Kinney यांच्या The Cold Within या कवितेचे स्वैर रूपांतर)

एक वेळ

(व्हॅलंटाईन्स डेच्या शुभेच्छा!)

एक वेळ होती
जेव्हा आपलं प्रेम होतं
मादक
एखाद्या उंची मदिरेसारखं

एक वेळ होती
जेव्हा आपलं प्रेम होतं
भावविवश
एखाद्या भडक प्रणयकथेसारखं

एक वेळ होती
जेव्हा आपलं प्रेम होतं
संमोहक
एखाद्या भानामतीच्या मंत्रासारखं

एक वेळ होती
जेव्हा आपलं प्रेम होतं
आश्वासक
एखाद्या एकनिष्ठ मित्रासारखं

एक वेळ होती
जेव्हा आपलं प्रेम होतं
अवघड
एखाद्या न सुटलेल्या कोड्यासारखं

एक वेळ होती
जेव्हा आपलं प्रेम होतं
पोषक
आईने भरवलेल्या घासासारखं

एक वेळ आहे
जेव्हा आपलं प्रेम आहे
आवश्यक
आपल्याला जिवंत ठेवणाऱ्या हवेसारखं

हृदय

हे अशक्य आहे – अहंकार म्हणाला
तू अपयशी होशील, आणि मग
मी दुखावला जाईन

खरं आहे – मी म्हणालो
पण अनुभव काय सांगतोय
ते तरी ऐकूया

हे जोखिमेचं आहे – अनुभव म्हणाला
कदाचित तुला यश मिळेलही
पण खात्री देता येणार नाही

ठीक आहे – मी म्हणालो
पण प्रज्ञा काय म्हणतेय
ते जरा पाहूया

हे अर्थहीन आहे – प्रज्ञा म्हणाली
केवळ तुझी ईर्षा आहे म्हणून
तू काहीही करशील का?

बरं आहे – मी म्हणालो
पण हृदय काय सांगेल
तेच आपण करूया

जरूर प्रयत्न कर – हृदय म्हणालं
हे अशक्य असेल, जोखिमेचं असेल
कदाचित अर्थहीनही असेल…

पण प्रयत्न केलास तरच तुला कळेल
आणि जर प्रयत्नच करणार नसशील
तर मग तुला माझा काय उपयोग?