माणूस

असा कसा तू माणूस | डोळे असून आंधळा
हात असून दुर्बळ | पाय असून पांगळा

असा कसा तू माणूस | सुखे भोगून दुखला
म्हणे माझे नाही कोणी | आप्त असून एकला

असा कसा तू माणूस | राजवाड्यात बेघर
सुखी खाऊनपिऊन | परी दुखणी दुर्धर

असा कसा तू माणूस | पैका असून गरिबी
जग लेवून पायाशी | म्हणशी मी कमनशिबी

असा कसा तू माणूस | शाळा शिकून अज्ञान
मोठा इमानी चाकर | स्वत:शी तू बेइमान

असा कसा तू माणूस | करी अर्थाचा अनर्थ
असे अंगी दैवी शक्ती | तरीही तू असमर्थ

असा कसा तू माणूस | चुकला रे तुझा नेम
तीच खरी माणुसकी | देई इतरां जी प्रेम

ऊठ जाग रे माणसा | डोळे उघड सताड
आत येऊदे उजेड | ऊठ उघड कवाड

सोनचाफा

पुन्हा एकदा
घड्याळाचे काटे सरसर मागे फिरावे
कॅलेंडरच्या पानांचे कागद भुर्र उडून जावे
अन् एक क्षणभर आपण परत प्रेमात पडावे…

पुन्हा एकदा
पाच बाराची फास्ट लोकल थांबावी
गर्दीत तुझी जॅार्जेटची साडी दिसावी
अन् छातीतली धडधड साऱ्या अंगात भिनावी

पुन्हा एकदा
रिकाम्या बसस्टॅापवर चिटपाखरू नसावे
किती उशीर केलास रे? म्हणून तू रुसावे
अन् मी हात हाती घेताच तू खुदकन हसावे

पुन्हा एकदा
दीड रुपयाची कॅाफी दीड तास पुरवावी
अनिश्चित भविष्याची इंद्रधनुष्ये रंगवावी
अन् बोलून होण्याआधी तुला घरची ओढ लागावी

पुन्हा एकदा
जुन्या चौपाटीवर बसून नवा सूर्यास्त निरखावा
ओल्या वाळूवर आपल्या नावांचा कित्ता गिरवावा
अन् भरतीच्या लाटेत आपला किल्ला वाहून जावा…

पुन्हा एकदा
मान वर करून तू माझ्या डोळ्यांत पहावे
तुझ्या सौंदर्याच्या जादूने मी मंत्रमुग्ध व्हावे
अन् तुझ्या जागी सोनचाफ्याचे फूल उमलावे

पिवळी पाने

(माझा एक कविमित्र, राम, ५ डिसेम्बर २०२० रोजी आम्हां सर्वांना सोडून गेला, ही बातमी ऐकल्यावर झालेली कविता. रामच्या ब्लॉगचे शीर्षक ‘Yellow Leaves’ असे आहे. )

पिवळी पाने
झालो आता
सारे आपण

चिकटून राहतो
सुकल्या फांदीस
ह्या आशेवर की
येऊ घातलेला
वाऱ्याचा झोत
शेवटचा न ठरो

एकदा पडलो
फांदीवरून की
जाऊ भरकटत
मग कोण जाणे
कधी कोण कोठे
कोणाला भेटणार?

पिवळी पाने
अन् थकली मने
आठवतायत
हिरव्या आठवणी
तरुणपणीच्या
वसंतातल्या

त्या आठवणी
आता देतायत चेतना
सुकल्या फांदीस
चिकटून रहायला
आणखी एक दिवस