कसा येशील मला न्यायला? चिडीचूप रात्रीच्या शांततेला न चाळवता चवड्यांवर चालणाऱ्या एखाद्या भुरट्या चोरासारखा नकळत येशील का? कसा येशील मला न्यायला? ढोल ताशे लेझीम बडवत झगमगत्या वरातीत मिरवणाऱ्या लग्नघरातल्या पाहुण्यासारखा वाजतगाजत येशील का? कसा येशील मला न्यायला? तुझा वेदनांचा खंजीर पाजळत माझ्या अंगाची चाळणी करायला सुपारी मिळालेल्या खुन्यासारखा आग ओकत येशील का? कसा येशील मला न्यायला? माझ्या आयुष्याच्या चित्रपटाची सगळी रिळं तुझ्या काखेत घेऊन त्याचा शेवट कसा होणार हे मला दाखवायला येशील का? कसा येशील मला न्यायला? धोतर, पगडी, शेंडी सांभाळत पश्चात्तापाच्या प्रार्थना आळवत मोक्षवचन देणाऱ्या भटासारखा अनवाणी पायांनी येशील का? कसा येशील मला न्यायला? कधीही ये रे, अन् कसाही ये पण हिंसा मात्र आणू नकोस रोगराई म्हातारपण काहीही असो नैसर्गिक शेवट देशील का? कसा येशील मला न्यायला? अक्राळविक्राळ यमदूत होऊन तुझ्या तळपत्या तलवारीच्या एकाच ओघवत्या घावाने मला मोकळं करशील का? कसा येशील मला न्यायला? मला हवा तो सुंदर चेहरा होऊन मला हवा तो मदतीचा हात होऊन माझ्या जीवनाचा अंतिम क्षण सार्थ करशील का?
Month: February 2020
जस्ट मी*
इज इट जस्ट मी की उगवत्या सूर्याला पाहिल्यावर तुमच्याही मनांत नव्या आशेचे किरण कवडसा पाडतात? इज इट जस्ट मी की रात्रीच्या आकाशातल्या कोट्यावधी तारका तुम्हालाही दूर अंतरिक्षात फिरायला घेऊन जातात? इज इट जस्ट मी की पहाटे पाकळीवर पडलेलं दव पाहून तुमच्याही डोळ्यांत अनामिक आनंदाश्रू उभे राहतात? इज इट जस्ट मी की हिमालयाची बर्फाच्छादित शिखरं दिसताच तुम्हालाही पाखरू होऊन आभाळात उडावंसं वाटतं? इज इट जस्ट मी की खळखळ वाहणाऱ्या झऱ्याचं हसू ऐकून तुम्हालाही आपल्या लहानपणची कागदी नाव आठवते? इज इट जस्ट मी की सुकलेल्या झाडाची खरखरीत साल तुम्हालाही तडक तुमच्या थकलेल्या आजीच्या हातांकडे नेते? इज इट जस्ट मी की दिवसभर होणारे हे सारे साक्षात्कार तुम्हालाही आयुष्याच्या अद्भुततेची आठवण करून देतात?
कसे राहाल?*
सांगा, कसे राहाल? आदर्शवादी राहाल तर कोठे जायचे आहे ते तुम्हाला समजेल व्यवहारी राहाल तर तेथे का जायचे आहे ते तुम्हाला उमजेल दूरदृष्टीने राहाल तर तुमचे गंतव्य स्थान कायम तुमच्या नजरेत राहील युक्तिबाज राहाल तर तुम्हाला तेथे पोहोचण्याचे नवे मार्ग मिळतील शिस्तबद्ध राहाल तर तुम्ही मार्गावर अविरत प्रगती करीत राहाल संतुलित राहाल तर निसरड्या वाटेवर तुमचं पाऊल घसरणार नाही सहनशील राहाल तर वाटेतले अडथळे तुम्हाला निराश करणार नाहीत कनवाळू राहाल तर तुमचे सहयात्री तुमच्या मदतीला येतील सहानुभूतिशील राहाल तर तुमचे साथी तुमच्या संगतीने चालतील प्रामाणिक राहाल तर तुमची यशे आणि अपयशे तुम्हाला स्पष्ट दिसतील सत्यवचनी राहाल तर लोक तुमच्या शब्दांचा आदर राखतील काटकसरी राहाल तर तुम्ही आपल्या पृथ्वीकडून आवश्यक तेवढेच घ्याल कृतज्ञ राहाल तर तुमची सारी सत्कृत्ये सेवाभावाने होतील एकाग्र राहाल तर तुमचे ध्यान पुढच्या मार्गावर केंद्रित राहील प्रबुद्ध राहाल तर तुमचा मार्ग घन्या अंधारातही ज्ञानदीपांनी उजळता राहील आता सांगा, कसे राहाल?