चालत रहा*

चालत रहा
किर्र अंधाऱ्या रात्रीतून
कारण तिच्या पलिकडे
उद्याची सकाळ आहे

पोहत रहा
प्रक्षुब्ध सागराच्या लाटांवरून
कारण त्यांच्या पलिकडे
वास्तवतेचा किनारा आहे

पाऊल ओढत रहा
निर्दय शिशिराच्या बर्फातून
कारण त्याच्या पलिकडे
वसंताचा पहिला बहर आहे

वाट काढत रहा
दाट काटेरी जंगलातून
कारण त्याच्या पलिकडे
झुळझुळ वाहणारा झरा आहे

आरोहत रहा
उत्तुंग पर्वतांच्या शिखरांवरून
कारण त्यांच्या पलिकडे
एकांताचं अथांग सरोवर आहे

भटकत रहा
या निनावी शहराच्या रस्त्यांवरून
कारण त्यांच्या पलिकडे
घरातल्या चुलीची ऊब आहे

कष्ट करत रहा
आला दिवस जाईपर्यंत
कारण त्याच्या पलिकडे
समाधानाची संध्याकाळ आहे

चालत रहा
साऱ्या संकटांतून, विपत्त्यांतून, आपत्त्यांतून
चालणं हेच आपलं आयुष्य
थांबणं म्हणजे संपणं

कधीतरी*

एक कविता… जी लिहायची राहून गेलीय
एक कविता… जी लिहिण्याचं धारिष्ट्य होत नाहीय
एक कविता… जी माझ्या आत्म्याला झोंबतेय
एक कविता… जी मला रात्रभर जागं ठेवतेय

अशी कविता… जिच्यात माझी माणुसकी भरलीय
अशी कविता… जिच्यात माझी विचारसरणी भिनलीय
अशी कविता… जिच्यात माझी अरक्षितता दिसतेय
अशी कविता… जिच्यात माझी प्रत्येक जखम धसतेय

ती कविता… जिने माझ्या मनाचा अंतराय शोधला
ती कविता… जिने माझ्या मनाचा गाभारा उजळला
ती कविता… जिने माझ्या मनातल्या ज्वाळा विझवल्या
ती कविता… जिने माझ्या मनातल्या वेदना शमवल्या

ज्या कवितेत… मी शून्यात डोकावून पाहिलं
ज्या कवितेत… मी दृष्टिहीनतेचं दुःख साहिलं
ज्या कवितेत… मी माझाच मला न्याहाळत राहिलो
ज्या कवितेत… मी आरशातल्या स्वतःला कुरवाळत राहिलो

त्या कवितेत… मी तुला बहाल केलेल्या यातना हव्या
त्या कवितेत… मी तुझ्यावर लादलेले अन्याय हवे
त्या कवितेत… माझा अप्पलपोटेपणा आणि ध्यास हवा
त्या कवितेत… माझ्या अहंकारितेचा उपहास हवा

कधीतरी… मी स्वतःला निरखण्याचं धैर्य गोळा करणार
कधीतरी… मी उजळ माथ्याने या जगात फिरणार
कधीतरी… मी माझ्या स्वत्वाला उघडं आभाळ दाखवणार
कधीतरी… मला आतून पोखरणारी ती कविता मी लिहिणार

समाधी*

हे कसलं वेड लागलंय मला?
का बेबंद झालंय माझं मन?
सहजपणे मी भटकतो आहे
वास्तवामधून कल्पनेकडे

हे कसलं वेड लागलंय मला?
गरगर फिरतंय माझ्या मनातलं होकायंत्र
अथांग अंतरिक्षात हिंडतोय मी माझं गीत गात
नक्षत्रांचा वद्यवृंद साथीला घेऊन

हे कसलं वेड लागलंय मला?
माझं स्वत्व झालंय समुद्रतळासारखं शांत
त्याच्या पृष्ठभागावर असोत कितीही लाटा
खोलवर मी झुलतोय समुद्रफुलांसमवेत

हे कसलं वेड लागलंय मला?
शोधतोय मी माझ्याच मनाची अपार  क्षितिजं
अबाधित, निश्चिंत, निरामय होऊन
विहरतोय मी स्वतःच्या अंतरावकाशात

हे कसलं वेड लागलंय मला?
पार निवळून गेल्या आहेत साऱ्या भावना
विरल्यात साऱ्या वेदना, सुखदुःखांनीही काढलाय पळ
नको आता काही उपाय, नको दिलासा,नको सांत्वन

हे कसलं वेड लागलंय मला?
तू आणि मी यांतला फरकही मला कळेना
कसलीच तमा राहिली नाही मला आता
सत्य काय अन् मिथ्य काय हेही आकळेना 

हे कसलं वेड लागलंय मला?
कशाने झालोय मी असा... अनुभवातीत, अतींद्रिय, अमर्याद?
हीच का ती ध्यानस्थ, चिंतनशील अवस्था... ती समाधी
बुद्धाला सुद्धा जिची वर्षोनवर्षं वाट पहावी लागली?