हरिद्वारला गंगेच्या किनारी उभा राहून
मी न्याहाळतोय हजारो भक्तांचं पापक्षालन
आजपर्यंत कधीच नव्हतो इतका एकाकी
मी ऐकतोय माझ्याच मनातलं बधिर आंदोलन
अंगात येऊन घुमणारा तो संमोहित समूह
त्या ज्वाळा, ते संगीत, तो नृत्यांचा जोश
आणि त्यांच्या मध्यात वस्तुनिष्ठ, तर्कनिष्ठ मी
ऐकतोय त्यांच्या मंत्रपठणाचा कर्कश जल्लोष
टक लावून पाहतोय पण माझ्या लक्षात येईना
ह्या नदीच्या पाण्यातली जादू मला कळेना
की त्यात नाहतांना भक्त आपल्या वेदना विसरतो
आणि चार शिंतोड्यांनी मांत्रिक दुर्धर व्याधी पांगवतो
विचारमग्न मी, तिथे खिळून उभा राहतो आहे
जे दिसतंय त्याच्या पलिकडचं अदृश्य दृश्य पाहतो आहे
आणि अचानक लक्षात आलंय की मी इथं एकटा नाही
गंगेचा हा खळाळता ओघ सांगू पाहतोय मला काही
नदीतली एकेक गारगोटी माझ्याशी गप्पागोष्टी करतेय
घाटपायऱ्यांच्या दगडविटांना देखील आता कंठ फुटतोय
हळूहळू ह्या गंगेचं गुपित मला समजूं लागलंय
भक्तिभावनेच्या शक्तीचं गणित मला उमजू लागलंय
एक वेळ अशी येते की शास्त्राची कास सोडावी लागते
एक वेळ अशी येते की अंतरीची आस ऐकावी लागते
अंतरात्म्याला वस्तुनिष्ठा, तर्कशास्त्र वगैरे कळत नाही
भक्तीची परीक्षा पास झाल्याशिवाय मुक्तीचं बक्षीस मिळत नाही
Like this:
Like Loading...
Related