कोरस*

सांगण्यासारखं आहे ते सगळं सांगून झालंय का?
लिहिण्यासारखं आहे ते सगळं लिहून झालंय का?

झालं असेल तर मग कशासाठी हा उपद्व्याप?
लिहिणारा आणि वाचणारा दोघांच्याही डोक्यास ताप?

सुरस सुंदर साहित्याच्या ह्या सागरतीरावर
मी पाण्यात सोडतोय माझी दुर्बळ कागदी नाव

असीम अथांग सृजनाच्या ह्या धावत्या प्रवाहात
माझ्या थेंबभर प्रतिभेचा कुठे लागणार ठाव?

अपार विश्वाच्या ह्या प्रचंड गदारोळात
चराचरातल्या प्रत्येकाचा एक सूर आहे

किडामुंगीपासून ते थेट देवमाशापर्यंत
प्रत्येकाचा आपापला आगळा नूर आहे

लक्ष देऊन ऐकलंत तर तुम्हालाही सारं कळेल
ह्या आरोह-अवरोहांची तुम्हालाही मजा मिळेल

एकेक वेगळा सूर-ताल तुम्हाला त्यांच्या जगात नेईल
कोणीच एकटा गात नाही हेही तुमच्या लक्षात येईल

प्राणिमात्रांच्या ह्या कोरसात माझाही एक आवाज आहे
ह्या वैश्विक वाद्यवृंदात माझाही एक साज आहे 

वेडा*

लोक म्हणतात ह्याला ठार वेड लागलंय
लोक म्हणतात ह्याचं डोकं तपासायला हवं
लोक बसतात लावत माझ्या स्वप्नांचा अर्थ
माझ्या मनातला अनर्थ त्यांना कुठून कळणार?

लोक म्हणतात हा आपल्याच जगात असतो
पण मला सांगा, तुम्ही किती वर्षं एकटे रहाल?
मला नाही इच्छा त्यांच्या जगात राहण्याची
माझ्या कल्पनेतलं जग त्यांना कुठून कळणार?

त्यांना वाटतं त्यांनी मला इथं कोंडून ठेवलंय
कारण म्हणे मी अकारण हिंसकपणे वागतो
कोण बांधील, कोण मोकळा, हे कोणाला उमगलंय
मला पिळणारी यातना त्यांना कुठून कळणार?

मला सुद्धा हवंय हो तुमच्यासारखं आयुष्य
मला सुद्धा हवी आहेत घर, बायको, मुलंबाळं
मला सुद्धा ऐकायचे आहेत हो तुम्हा सर्वांचे आवाज
पण मला बहिरं करणारा माझ्या मनातला कोलाहल 
तुम्हाला कुठून कळणार?

धुंदीत

कशाच्या धुंदीत जगायचे
आता कशाच्या धुंदीत जगायचे

बालपण होते मायेला पारखे
पालवी मरून उरत बुडखे
भाजके चिंचोके मोजायचे
आता कशाच्या धुंदीत जगायचे

तारुण्याची रग जगाला आव्हान
परिवर्तनाची लागली तहान
विचार निखारे झेलायचे
आता कशाच्या धुंदीत जगायचे

तशात फुलले प्रीतीचे फुलोरे
मनांत बांधले स्वप्नांचे मनोरे
ढगांवरी पाय पडायचे
आता कशाच्या धुंदीत जगायचे

प्रपंच संसार यश अपयश
मध्यमवर्गीय सोवळे निकष
दोरीवरी तोल मापायचे
आता कशाच्या धुंदीत जगायचे

वार्धक्य ठाकले दार ठोठावीत
देवधर्माचे न उमगे गुपित
उगाच का टाळ कुटायचे
आता कशाच्या धुंदीत जगायचे

कशाच्या धुंदीत जगायचे
आता कशाच्या धुंदीत जगायचे?