परवानगी*

अजूनही अश्या काही गोष्टी आहेत…

उदाहरणार्थ… सकाळच्या पहिल्या सिगरेटचा पहिला झुरका
जो आपल्याला स्वतःच्या जिवंतपणाची आठवण करून देतो  

उदाहरणार्थ… पिकलेल्या पिवळ्या धमक हापूस आंब्यातला आंबटगोड मांसल गर
जो शापित प्रखर उन्हाळ्याची असह्य घालमेल घालवून टाकतो

उदाहरणार्थ… खूप वर्षांनी भेटलेल्या मित्रांच्या संगतीत निघालेल्या निरागस तारुण्याच्या आठवणी
ज्या खळखळ हास्याची कारंजी उडवून क्षणभर ते तारुण्य परत आणून देतात

उदाहरणार्थ… अजूनही तिच्या दोन डोळ्यांत लकाकणारी लाखो लाजरी नक्षत्रं
जी तिनं हो म्हणताच आपल्या हृदयातली अनाहूत धडधड वाढवतात

उदाहरणार्थ… खूप दिवस आसावलेल्या धरतीवर पहिला पाऊस पडल्यानंतर येणारा सुगंध
जो एखाद्या जादुई कस्तुरीसारखा आपल्या जिवाला चाळवत राहतो

उदाहरणार्थ… आताच वाचून संपवलेल्या पुस्तकावर समाधानानं मारलेली थापटी
जी आपल्या मनांत एक निराळं नवीन दिवास्वप्न पेरून जाते

उदाहरणार्थ… मनातल्या मनांत, अंतरात्म्याच्या गाभाऱ्यात आकार घेणारी कादंबरी
जी अप्रकाशितच राहणार हे ठाऊक असूनही आपल्या ओठांवर हसू वसतं

ज्यांचा आनंद भोगण्याची आपल्याला परवानगी आहे
अजूनही अश्या काही गोष्टी आहेत…

काव्य*

काव्य म्हणजे कागदावर उमटलेल्या भावना
काव्य म्हणजे बोचणाऱ्या झोंबणाऱ्या यातना
काव्य म्हणजे प्रेरणेची आर्त आतुर प्रार्थना
काव्य म्हणजे कल्पनेला आर्जवाची चेतना

काव्य म्हणजे मानवाच्या अस्मितेची स्पंदने
काव्य म्हणजे मानवाच्या वेदनेची वाहने
काव्य ही कातावलेल्या कामनांची कीर्तने
काव्य ही तर नादध्वनिची आगळी आवर्तने

काव्य म्हणजे भावपंकी कमळ उमले कोवळे
काव्य म्हणजे कविमनाचे मर्म झाले मोकळे
लोक बघती दगडधोंडे; शिल्प कविला आकळे
शक्त कविच्या कुंचल्यातुन चित्र बनते वेगळे

काव्य म्हणजे आळवोनी शब्दभिक्षा मागणे
काव्य म्हणजे तळमळोनी मध्यरात्री जागणे
काव्य म्हणजे लख्ख पडले शारदेचे चांदणे
काव्य म्हणजे जे कवीला स्वप्न पडले देखणे

ब्लूज*

मला ब्लूजचं संगीत ऐकायला खूप आवडतं
हृदयभंगाच्या विलक्षण वेदनेनं विव्हळणारं ते गिटार
कधी कधी माझा जीव खाऊन जातं
तर कधी कधी कडक उन्हाळ्यातल्या
वळीवाच्या पावसासारखं कोसळून
माझ्या मनाची तडफड झटक्यात शांत करून जातं

कपाशीच्या शेतात सक्तमजुरी करणाऱ्या गुलामांचं
ते साधंभोळं संगीत
त्यात नसते कल्पनांची करामत
नसतं संधीसमासांचं सौंदर्य
नसतात उपमाउत्प्रेक्षांची उड्डाणं
असतो केवळ अपेक्षाभंगाच्या आवेदनेचा
एक अजाग अनपढ आक्रोश... जीवघेणा

नको त्या वेळी ते सूर कानावर पडले
की जिव्हार फाडून जातात
पण तरी जाता जाता मनुष्याच्या
अनावर अक्षय अभंग अस्तित्वाची
आठवण देऊन जातात

मग बघतां बघतां उडून जाते माझी उदासी
आणि मी परत होतो
एक भाग्यवंत