रात्र*

कुठून उगवली ही रात्र?
आज कोल्हीकुत्रीं स्तब्ध आहेत
पण चंद्र ओरडून आकांत करतोय

कुठून उगवली ही रात्र?
आज भुतंखेतं शांत बसलीयत
पण झाडंवेली नाचून धिंगाणा घालतायत

कुठून उगवली ही रात्र?
आज रातकिडे गप्प झालेयत
पण माझ्या कानांत त्यांची कर्कश किरकिर गुंजतेय

कुठून उगवली ही रात्र?
आज समुद्राला लाटा नाहीत
पण माझ्या मनात त्यांचा भीषण गदारोळ उठलाय

कुठून उगवली ही रात्र?
आज डोळे बंद असूनही सगळं स्वच्छ दिसतंय
पण डोळे उघडले की किर्र अंधार होतोय

कुठून उगवली ही रात्र?
अजून तुझा ऊष्ण श्वास माझ्या गालाला भिडतोय
पण माझा हात शेजारच्या रिकाम्या उशीवर पडतोय

मनमानी

व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली
करू नका रे मनमानी
एखाद्याचं राजकारण पटलं नाही म्हणून
त्याच्या चारित्र्याची का बरं हानी?

द्वेष पसरवणारे सैतान
बसले आहेत टाकून गळ
त्यांचं लक्ष्य एकच आहे
तुमच्या मनातली तळमळ

त्यांची शिकार बनू नका
नका गिळू त्यांचं आमिष
तुमचा जीव घेऊन उरेल
इतकं जहाल आहे ते विष

काही पसरवायचंच असेल 
तर या अफवांचा नाद सोडा
पसरवा प्रेम आणि सामंजस्य
माणसाला माणूस जोडा

शब्द

शब्द म्हणजे सोन्याची खाण
शब्द म्हणजे जहरीला बाण

शब्द म्हणजे मोत्यांची लड
शब्द म्हणजे पापणीची फडफड

शब्द म्हणजे प्रेमाचा पान्हा
शब्द म्हणजे निजलेला तान्हा

शब्द म्हणजे प्रणयाचा रंग
शब्द म्हणजे प्रियेचा संग

शब्द म्हणजे भावनेचा सूर
शब्द आणे जवळ, शब्द नेई दूर

शब्द म्हणजे तांडवाचा ताल
शब्द म्हणजे लंगडीची चाल

शब्द म्हणजे पणतीची वात
शब्द म्हणजे खंजिराची पात

शब्द नको विखरू इकडे अन् तिकडे
नको करू शब्दांनी काळजाचे तुकडे

हरवलेला*

आजकाल मी हरवलेला असतो
जगाला मी दिसतो
पण मी माझ्याच विश्वात वसतो

जिथे नसतो रोजचा संघर्ष
नसते कायमची निराशा
नसतात अपूर्तीच्या यातना

जिथे कधीच अंधार होत नाही
सारे दिवे पेटते राहतात
सगळे रस्ते स्वच्छ दिसतात

जिथे नसतो स्वप्न आणि सत्यात फरक
दोन्ही डोळे लोलक बनतात
आणि दृश्यांची इंद्रधनुष्यं होतात

जिथे मी जागेपणी निजतो
आणि झोपेतही जागा असतो
जिथे प्राण गमावूनही मी जिवंत असतो