पिंपळाच्या पारंब्यांत लपलेला बुद्ध
मला बरंच काही सांगून गेला
शांत, स्तब्ध बसलेला बुद्ध
माझं मौन भंगून गेला
ज्यांनी जग घडवलं त्या
पंचमहाभूतांत विलीन व्हावे
त्यांच्या दृष्यात, गंधात, स्पर्शात
स्वत:ला झोकून द्यावे
उफाळलेल्या वादळाचा
गदारोळ पाठीवर घेऊन
हृदय शांत ठेवणाऱ्या
महासागरासारखे व्हावे
आसुसलेल्या जमिनीला
पावसाचा आशीर्वाद देऊन
मातृत्व बहाल करणाऱ्या
मेघराजासारखे व्हावे
आपल्या मखमली स्पर्शाने
अंगावर शिरशिरी आणून
पुष्पगंध पसरवणाऱ्या
वार्याच्या झुळुकेसारखे व्हावे
आपल्या घनदाट छायेत
थकलेल्या वाटसरूला
आसर्याची माया देणाऱ्या
वटवृक्षासारखे व्हावे
कधीकधी काही गोष्टी
समोर आल्यावरच कळतात
देऊळ दिसल्यावरच पाय
भक्तिमार्गाकडे वळतात
Like this:
Like Loading...
Related