तुझ्या जळत्या सू्र्याच्या उन्हात
उभं केलंस मला
तर मी होईन एक वटवृक्ष
आणि देईन माझ्या सावलीत विसावा
कोण्या एका थकलेल्या वाटसरूला
तुझ्या शक्तिशाली हातोड्याचे
प्रहार केलेस माझ्यावर
तर मी होईन एक शिल्प
आणि देईन अपूर्व आनंदाचं लेणं
कोण्या एका उत्सुकलेल्या रसिकाला
तुझ्या कुंभाराच्या भट्टीत
खुपसून भाजलंस मला
तर मी होईन एक मृत्कलश
आणि माझ्या पाण्यातून देईन पुनर्जीवन
कोण्या एका आसुसलेल्या तृषार्ताला
तुझ्या सोनाराच्या मुशीत
ओतून वितळवलंस मला
तर मी होईन एक दागिना
आणि माझ्या लखलख झळाळीने सजवीन
कोण्या एका कोवळ्या नववधूला
तुझ्या विणकराच्या मागात
बांधून ताणलंस मला
तर मी होईन एक उपरणं
आणि माझ्या ऊबदार मायेने झाकीन
कोण्या एका विकलांग वृद्धाला
मला या आयुष्याचं वरदान दिलंस
मोठी कृपा केलीस माझ्यावर
आता माझ्या आयुष्याला अर्थाचं दान दे
नाहीतर मला सांग, ह्या माझ्या जगण्याचा
काय उपयोग? आणि कोणाला?
Like this:
Like Loading...
Related