का*

तुला पाहणं म्हणजे केवळ
माझ्या दृक्पटलावर होणारा किरणोत्सर्ग असेल
तर मग मी दिवसभर
का तुझ्या वाटेवर डोळे लावून बसतो?

तुझे सूर म्हणजे केवळ
माझ्या कर्णपटलावर पडणाऱ्या ध्वनिलहरी असतील
तर मग तुझ्या गाण्यात 
का मला माझ्या आयुष्याची धून ऐकू येते?

तुझा गंध म्हणजे केवळ
माझ्या नासिकेला उत्तेजित करणारं रसायन असेल
तर मग तुझ्या घनदाट केसांत लपतांना
का मला स्वर्गात शिरल्यासारखं वाटतं?

तुझा स्पर्श म्हणजे केवळ
माझ्या बाह्यत्वचेला मिळणारी प्रेरणा असेल
तर मग तुझ्या ओठांतल्या अमृतासाठी
का माझे ओठ आसुसतात?

शास्त्र मला सांगतं की तू केवळ
माझ्या संवेदनेचा, अनुभूतीचा एक अंश आहेस
तर मग तू माझ्या आत्म्याच्या अंतर्विश्वाला
का व्यापून राहिली आहेस?

भूत*

खरं सांगू का?
ह्या कविता मी लिहीत नाही
त्या स्वतःला लिहवून घेतात माझ्याकडून
उभ्या राहतात माझ्या डोळ्यांत
अश्रूंसारख्या
आणि मग माझं कलम मारतं सूर
माझ्या मनातल्या शाईच्या दौतीत

खरं सांगू का?
हे शब्द मी निवडत नाही
ते स्वतःहून माझ्या समोर येतात
पाखरांच्या सुंदर ओळींसारखे
त्यांचा हा आकृतिबंध 
मी नाही घडवत - तो आपोआपच घडतो

खरं सांगू का?
एखाद्या कवितेत किती कडवी असतील
हेही मला ठाऊक नसतं
आता हीच कविता पाहा नं
आणखी एक कडवं उरलंय
असं माझी प्रेरणा मला खुणावून सांगतेय

खरं सांगू का?
कधीकधी असं वाटतं 
की आपणां सर्वांत सामावलेल्या
वैश्विक धुळीचं असेल का हे एक रूप?
नाहीतर मग मला झपाटून राहिलंय 
कधीकाळी काळात विलीन झालेल्या
एखाद्या अनामिक कवीचं भूत?

परवा*

परवा मला वाटलं, मला येशू दिसला
एका सुताराचा छोटा मुलगा
त्याला रंधा मारायला मदत करत होता

परवा मला वाटलं, मला मोझेस दिसला
एक भोळाभाबडा धनगर
आपल्या म्हशींना नाल्यातून पार नेत होता

परवा मला वाटलं, मला महंमद दिसला
एक म्हातारा शिंपी 
आपल्या अधू डोळ्यांनी सुईत दोरा ओवत होता

परवा मला वाटलं, मला बुद्ध दिसला
एक आंधळा भिकारी
आपला निर्जीव हात उचलून दात्यांना आशीर्वाद देत होता

परवा मला वाटलं, मला झरतुष्ट्र दिसला
एक थकलेला पेन्शनर
त्याच्याचसारख्या दुसऱ्याचा हात धरून रस्ता ओलांडत होता

तुम्ही उभारा तुमची चर्चेस
तुमची मंदिरं, तुमच्या मशिदी
मी माझा धर्म घडवतोय
या दुबळ्या देवदूतांच्या संदेशातून
 

मार्बल

आम्ही पुण्यात जिथे राहतो
तिथे पूर्वी शेतं होती
ऊसांचे दाट फड होते
रात्री भुतंखेतं होती

शेती जाऊन वर्षे झाली
आता आले हाय राईझ
मजल्यांवरती चढले मजले
हरेक फ्लॅट किंग साईझ

शेतकऱ्यांनी पैसे केले
इथून आले तिथून गेले
छोटे शून्य मोठे शून्य
एक फेके दुसरा झेले

झोपडीत म्हातारा निजतो
तेल संपतं, पणती विझते
माॅल मध्ये धाकटी नात
मार्बलच्या फरश्या पुसते