कोण तू? वाऱ्यावर उडत आलेल्या सुकल्या पानाला मी विचारलं मी तुझा भूतकाळ, ते म्हणालं वसंत आणि ग्रीष्माबरोबर माझे दिवस संपले आता शिशिराबरोबर माझाही अंत होईल कोण तू? खिडकीत टपकलेल्या चिमणीला मी विचारलं मी तुझं भविष्य, ती म्हणाली मी जाणार उडून दूरदेशी आणि पाहणार तू कोण होणार आहेस कोण तू? उंबरठयावर धावण्याऱ्या मुंगीला मी विचारलं मी तुझं वर्तमान, ती म्हणाली मी थांबून गप्पा मारल्या असत्या तुझ्याशी पण आपणा दोघांना खूप कामं आहेत ना? कोण तू? कोनाड्यात तेवण्याऱ्या मेणबत्तीला मी विचारलं मी तुझं आयुष्य, ती म्हणाली जाणाऱ्या प्रत्येक क्षणाबरोबर मी कमी कमी होतेय पण मला जळत रहायला हवं तुला सगळं दिसावं म्हणून
Month: January 2019
अवशेष*
इथे पडले आहेत भग्न अवशेष एके काळीच्या प्रगत संस्कृतीचे कोण जाणे कुठल्या हिंसक, विध्वंसक ज्वालामुखीने गाडली तिला आपल्या धगधगत्या राखेखाली इथे पडले आहेत भग्न अवशेष एके काळीच्या जिवंत समाजाचे कोण जाणे कुठल्या भीषण, भयानक भूकंपाने भुईसपाट केले त्याला आणि मांडले हे दगडधोंड्यांचे ढीग इथे पडले आहेत भग्न अवशेष एके काळीच्या भव्य ऐतिहासिक शहराचे कोण जाणे कुठल्या महापुराने पुरून टाकले त्याला काळ्या मातीच्या कांबळ्याखाली इथे पडले आहेत भग्न अवशेष कोणा एकाच्या लाघवी मैत्रीचे कोण जाणे कुठल्या सूडकरी दुष्कृत्याने करून टाकल्या तिच्या हजारो धारदार कपच्या इथे पडले आहेत भग्न अवशेष कोणा एकाच्या प्रणयी वैवाहिक जीवनाचे कोण जाणे कुठल्या बेलगाम प्रतारणेने चेतवली त्यात अविश्वासाची अमंगल आग इथे पडले आहेत भग्न अवशेष कोणा एकाच्या सुखी, समाधानी आयुष्याचे कोण जाणे कुठल्या दैनंदिन झिजेने केली त्याची माती माती आणि आणि काही अशनी तेवढे सोडले...असंतुष्टतेचे
कविराजा
शब्द आणिले तुला मी कविराजा लडिवाळा बाळमुठीत धरून वाजवी रे खुळखुळा आल्या उपमा उत्प्रेक्षा बघ तुझ्या बारशाला त्यांचे पदर फाडून लावू तुझ्या दुपट्याला आले नाही जरी दात तरी सर्वांना चावतो नाही येत रांगताही तरी पुढे तो धावतो पहा कसा कविराजा चुरूचुरू बोलतोय काव्य आपले ऐकून आपणच डोलतोय म्हणे करूनी उड्डाण चंद्रसू्र्य मी धरीन म्हणे देवादिकांनाही हतबल मी करीन शब्द एकावर एक उभा राहिला मनोरा सुकं निर्माल्य वेचून फुलविला हा फुलोरा लोक म्हणती कविता थिजलेली विझलेली लंगोटीतून निघाली म्हणून ती भिजलेली थांबवा ही क्रूर टीका करू नका उपरोध माझ्या बाळाची कविता जरी असे बाळबोध
बहाणा
का अबोला का दुरावा क्रोध का इतुका करावा दाखवी हासून खुदकन् प्रीतिचा अपुल्या पुरावा मित्र माझे घे म्हणाले घेतली दो थेंब दारू खून चोरी मी न केली तू नको लाठी उगारू चूक माझी भूल माझी काय प्रायश्चित्त घेऊ एक प्याला जास्त झाला नको स्वर्गी सूत नेऊ बोल की डार्लिंग मजशी मौन करते मज दिवाणा चल हिऱ्याचे टॉप्स आणू प्रीतिचा असली बहाणा